पत्रांक ३५८
श्री १७९३ वैशाख सुमारे.
पुरवणी सेवेसी विज्ञापना
x + + घडवाव्या. त्या आह्मांपासून जाल्या नाहींत. त्याचीं कारणें तशीच पडलीं. सांगतां येत नाहीं. त्यास, आतां श्रीमंत राजश्री नाना यांणीं तह संबंधी बोलणें ऐकोन घेऊन तहावरील गोष्ट पाडित असल्यास, मीच पुणियासी येतों. याचसंबंधें आह्मीं टिपूस लेहून पाठवून, लाख दोन लाख रूपयांचें जवाहीर नजर करावयासीं घेऊन येतों. आमचें बोलणें सर्व ऐकून घेऊन, जेणेंकरून टिपूची दौलत राही अशी एखादी तोड काढून समेटांत आणावें. असें बहुत तपसीलें विनंती करावयासीं सांगितली. आणि आपल्यास येणेविशीं श्रीमंतांनी आज्ञा केल्यास, टिपूकडून जवाहीर नजरेचें आणावयाचें, त्यास वाटेनें सांडणीस्वार निभावले पाहिजेत. त्याविसीं श्रीमंतांचीं पत्रें राजश्री तात्या यांसी व राजश्री भाऊ यांसीं असावा. नाहीं तरी, मध्येंच लुटले जातील, असें सांगितलें. त्याजवरून सेवेसीं विनंती लिहिली आहे. सेवकास बदरीजमानखान वस्त्रें देत होता. घेतलीं नाहींत. तेव्हां एक घोडा लहानसा द्यावयासीं लागला, तोहि मीं घेतला नव्हता. मी निघोन पुढें सात आठ कोश आलों. तेथें मागाहून माणसाजवळ देऊन मजकडे पाठविला. तत्रापि मी घेत नव्हतों, माणूस माघार घेऊन जाईना. तेव्हां तो घोडा मी बरोबर घेऊन आलों आहे. बदरीजमानखान बहुत बोलणीं बोलला आहे. सेवेसी आल्यावरी समक्ष विनंती करीन. करवीरास आलों, तों महाराज श्रीकृष्णास्नानास कन्यागत आहे ह्मणून गेले. पांच सात रोजीं येतील. आले ह्मणजे येथील गुंता उरकोन सेवेसीं येतों. बदरीजमानखान याचे बोलण्याचा भावआतुरपणा बहुत दिसतो. कसेंहि करावे आणि तह होय अशी गोष्ट व्हावी असें बोलणें आहे. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना. *