पत्रांक ३५७
श्रीव्यंकटेश प्रा. १७१३
शेवेसी सां नमस्कार विनंती ऐसी जे. स्वामींनीं दोन नकला व एक पुरवणी कित्ता खास दस्तूरची चिठी पाठविली ती पाऊन भाव समजला. स्वामीनी लिहिलें तें सर्व यथार्थ आहे. मीहि स्वामींच्या आज्ञेप्रमाणेंच वर्तणूक करितों. स्वामीकडे जाऊन आलों याच तर्कावर कयास बांधून रास्ते यांस लिहिलें असतील, इतकाच अर्थ, आपण चित्तांत संदेह आणूं नये. वरीष बारा जाल्यासहि लेख किंवा उच्चारांत गोष्टी येणार नाहीं. आदिपश्चात सर्व ध्यानांत धरून कोण्या रीतीनें आज्ञा कशी कशी जाहली आहे त्याच बेतानें कार्यास प्रवर्तलों आहें. इकडीलविशीं जशी पाहिजेल तशी खातीरजमा असली पाहिजे. पेशजी दुर्गचें टिप्पण करून पाठविलें आहे, म्हणोन सेवेसीं विनंती लिहिली होती. त्यास, एक वेळ तेथपर्यंत माणूस जाऊन वाटा चालत नाहींत. दुर्गाभोंवताले स्वार फिरत आहेत आणि दुर्गचें संधानहि भाऊकडे लागलें आहे. अशांत, आपण गेलें असतां पत्र पुढें रवाना होणार नाहीं, म्हणोन माघारा आलों. त्यानंतर सर्वेच त्या बा। जोडी करून देऊन तेथें एक दोन पत्ते पूर्वील वळखीचे बोलेनें संधान होतें तें सांगून, मुख्य कोठें आहे तेथेंच रवाना केलें आहे. माणून येथून गेला तो शाहाणा आणि इतबारी, यांत गुंता नाहीं. दोन रोज अधिक उणें, उत्तर घेऊन येईल. कामकाज बनून येणें तेथील आस्था प्रमाण. राजश्री आपाजीराम संधानाकरितां आला आहे ह्मणोन येथें आल्यावर ऐकिलें, हेंहि खरें. पूर्वी कराडीं असतांना पळून सावनुरास आला आहे, ऐसें ऐकिलें होतें. येथें आल्यावर व स्वामीच्या लिहिल्यावरून संधानास आला आहे, असें समजलें. पूर्वीपासून त्याचें लक्ष्य स्वामीच्याठाई नीट आहे आणि माझे सर्व ठाईहि विश्वास आहे. त्याजकडे कोणासहि पाठविल्यानें आम्हांकडे वळेल. यांत गुंता नाहीं. परंतु मुख्य बडबड्या व भोळा. चित्तांत गोष्टी राहत नाहींत. कागदींपत्रीं जाबसाल लाविल्यास, आपल्या महत्त्वाकरितां पत्रें दाखवायास देखील अंदेशा करणार नव्हे. तो साधक नव्हे. सिद्ध पुरुष आहे. तेव्हां इकडील अडचणी त्याचे ध्यानांत कोठून भरणार? याजकरितां कागदीपत्रीं संधान नीट पडणार नाहीं. त्याकडेहि कोणसा आप्त पाहून निरोपानेंच स्थूलमानेकडून तेथीलहि भाव घेतों, मुख्य मूळापासून काम होऊन आल्यास सर्वोपरी चांगले. त्याच प्रयत्नांत आणखी एकदोन संधानें आहेत. एक वेळ हरप्रयत्नें श्रीमंतांनीं आपणांस सांगितल्यावर शेवकहि हंडी तो उतरून देतों. पेस्तर सिद्धीस नेणें स्वामीकडे. आमचे चुलते ती।। रा। लक्ष्मणराव व रामराव ह्मणोन, बाहादराच्या सैन्यांस स्वामी होते त्या वेळेस त्यांची भेटी स्वामीस करविली होती. आणि त्यांचे प्रयोजनास स्वामी अनकूल जाले होतेत. बहुतकरून स्मरणांत असेल, ती।। लक्ष्मणराव तो त्यांजकडेच आहेत. ती।। रामरावकाका हे मात्र घरांस आले होते ते आजपर्यंत घरींच होते. सांप्रत आमच्या भेटीकरितां आणि एकदोन मुलीहि पाहून आहेत. ते येथेंच आहेत. त्यांसींहि वरचेवर बोलण्यांत येत जातें. पुर्ते पक्केंपणे निखालसता आमची जाली म्हणजे त्यांची रवानगी मुख्यापर्यंत करून बनल्यास हुजुरांत राहून कामकाज करून वरचेवर पाठवणेस येईल; आणि योग्यताहि आहे. चित्तावर घेतल्यास सर्वहि करितील. हें जाणून त्यांची रवानगी करावी ह्मणतों. पुर्ते समर्पक दिसल्याप्रमाणें करीन. कोण्हेविशींहि इकडील चिंता आपण करू नये. आपल्या वाटेस येई तोच प्रकार इकडून घडेल. पत्र पाहून विसर्जन करावें. लोभ करावा हे विनंती. ती।। रा। रामरावकाका यांणीं स्वामीस पत्रें लि।। आहेत. विदित होईल. हे विनंती.