पत्रांक ३५६
श्री १७१२ भाद्रपद शुद्ध २
श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक जनार्दन सिवराम कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ता। भाद्रपद शुद्ध २ पावेतों स्वामीचे कृपेंकरून सेवकांचें वर्तमान यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमानें: आषाढ वा। सप्तमीस सरकारची जोडी रवाना जाहली, तें पाऊन सकल वर्तमानें ध्यानारूढ जाहली असतील. अस्विनीस्थ नृपाचें वर्तमान दोन तीन पत्रीं तपासलें लिहिलें तें ध्यानांत असेलच, विद्यमानी गौनर होरन बहादर यांनीं आरणीचे दत्तपुत्र श्रीनिवासराव यांस अधिकारावरीं स्थापिलें, आस्विनीस्थ नृपासी व आहालेकारासी आणि आत्रीस्थासी फारच वैमनस्क येऊन पडलें आहे. यासमई जे यांनीं केलें तें केलें, तीन अधिकार उभयेता बधूंसच आहेत. दुयेम गौनर कासमेजर यांचें कांहीं चालत नाहीं, खामाखाये आस्विनीस्थ दत्तपुत्रासच स्थापावें ह्मणून फार आग्रहांत आहेत. त्यास निमित्य व येक आसरा नबाबसालाचा धरून हें काम करावें, ह्मणून आह्मांस बोलाऊन सांगितलें जें: याविषईचें अगत्य श्रीमंतांस असावें. त्यांनीं उपेक्षा केल्याकरितां ज्याच्या मनांस जैसें आलें तैसें करितात. याकरितां याविषयींचा बंदोबस्त करावा. मसविद्याप्रमाणें पत्रें आल्यास, श्रीदयेनें न्यायमार्गच केला जाईल. त्यास, तीन पत्रें यावीं. श्रीमंत महाराज शाहूराजे यांचे पत्र यावें. जे, पूर्वी आह्मी सराचे बेलड केमळ यांस चंदावराविषयी लिहिलें होतें. त्यांनीं दरजबाब पाठविले नाहींत. आह्मी ऐकिलें होतें जेः इंग्रेज लोक न्याये पंचायतीकडून काम पाहतात. ह्मणून ऐकत होतों. विद्यमानीं बहूतच अविहित आमलेंत आणिलें आहे. तें काय ह्मणजे, तुलजाजीराजे यासी संतती नाहीं. तेव्हां आमच्या दायेजाचे मुलास दत्त घेतले तें किंनिमित्य? म्हणजे अस्सल कौमेचा यास अधिकार, पण इतरांस नाहीं. प्रतापसिंग राजे यांनीं येक कलवातणीस ठेविलें होतें. ते न व्हता, व्यंकणा म्हणणारासी तीसी संमध पडला. ऐसें असतां, तिला येक लेक जाहाला. त्यासमई प्रतापसिंगराजे म्हणाले जे, हा मूल मजसारिखा नाहीं, व्यंकणा सारिखा आहे. ऐसें म्हणून तिजला इतराजीखाले ठेऊन, त्या मुलास नजरबंद ठेविलें होतें. ऐशा मुलास तुलजाजी याचा भाऊ म्हणून, त्याला पट बांधिलें आहे, म्हणून ऐकिलें. त्यावरून हे न्यायेरीती कोणती ? दत्तपुत्र घेतला त्यास सोडून देऊन, गैरवारसास आमचे घर देणें फार अनुचित. तुम्हांस व आम्हांस स्नेहभाव विशेष आहे. तनमुळें लिहिलें जातें जें, आमचे घर काहाडून ऐशीया कंचिनीच्या मुलास देणें अविहित. मुख्य आमच्या कौमांत पुत्र नसल्यास दत्तपुत्रच अधिकारी, ऐसें आहे. यांत आपल्या चित्तास वित्यास भासल्यानें, आपण अपरोक्षी आमच्या शास्त्रप्रकारें न्यायेरीतीनें आमच्या दायेजाचा मूल तुलजाराजे यांनी पोसणा घेतला. त्यासच आमचे घरीं ठेविजेसें केलें पाहिजे, येखादे आपले चित्तीं असेल कीं सराचे बेलड केला त्याप्रमाणें केलें. हे मनांत असेल तरी, हें वर्तमान समग्र आमचे स्नेहांत लाट कारणवालिस यांस विनंति लिहून त्याचा हुकुम घेऊन आमचे मुलास आमचे घरीं ठेविलें पाहिजे. आमचे मुलास आमचें घरीं ठेविनास गेल्यानें तुमच्या व आमच्या स्नेह्याचीं अभिवृद्धि कसी होईल ? आह्मीही हे अर्थ आवघे सूचना केली आहे. कंपणीची आमची दोस्ती आहे. त्यापक्षी आपले चित्तीं ही स्नेह्याभिवृद्धि करावी म्हणून असेलच. परंतु इतरता येणार नाहीं; व जेणें कडून हरदो तर्फेची खुषी होऊन दोस्ती राहील तेच आपण करितील, हे आमच्या चित्तांत खातरजमा असे. दोस्तीचे ठाई ज्यादा कलमी कायेद्याप्रमाणें महाराज राजे यांचे मोहरेनिशी येक पत्र यावें. तैसेच सरकारचे पत्रांत ल्याहावें जेः महाराजांनीं लिहिल्याप्रमाणें तुम्ही आमलांत आणावें. येणेकडून खुषी होऊन दोस्ती राहात आहे. जेणेकडून आमचे राजेयाचे घरचा बंदोबस्त होऊन संतोष होतील तें करावें. यावरी ऐसें सरकारचें पत्र मर्जीस आल्यास सरकारचे तर्फेने जे ल्याहावयाचे भाव ल्याहावे. तिसरें, आपलें खास पत्र यावें जे, येथील कितेकबाबती राजेयांनीं व श्रीमंतांनीं तुम्हांस लिहिले आहेत. त्याप्रमाणें संवस्थानचा बंदोबस्त करून उत्तरें लवकर पाठवावीं. येणेंकडून सकल लोकांस संमत व खुषी होत आहे. जेणेकडून न्यायेप्रकारें कोणी शब्द ठेविनासारिखें आम्ही लिहिल्याप्रमाणें अमलात आणावें. सर्व जाणत्यास विशेष काय लिहिणें असे. ऐशीं तीन पत्रें आणवावीं म्हणून सांगितलें; व मसविदाही त्यांनींच ठराऊन दिल्हा. त्याप्रमाणें सेवेसी विनंति लिहिली आहे. तरी याविषयींची तजवीज करितां लिहिल्याप्रमाणें पत्रें यावीं. येणेंकडून सरकारास कीर्ति येत आहे. दुसरे संवस्थानचा अभिमानही प्रसिद्ध होऊन दाब राहत आहे. नूतन स्थापना जाहाल्यासीवाय सरकारचे लक्षांत येत नाहींत. अधिकारस्थ विप्रास आकाश दीड बोट आहे. कोणासही खातरेंत आणीत नाहींत. आपले ठिकाणीं जसी सरकारची मोहर आहे तद्वत पंतप्रधानाची मोहर केली. असो. आपले घरांत कांहीं करोत. परंतु सरकारची बरोबरी व सरकारासी स्पर्धा केल्यानें कल्याण कैसे होतें, राजपत्न्या वगैरे सर्वत्रांस बेदिल केलें आहे. हें समग्र तपसील तपसिलें सरकारचे जोडीबराबरी सेवेसी लिहिले आहेत. त्यावरून ध्यानास आलें असेल. यांची उत्तरे लवकर यावीं. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.