पत्रांक ३५५
श्री १७१२ आषाढ वद्य.
राजश्री आपाजीराव स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरी. इसमालबेग नारनोळावर होता. तेथे त्याचीं पलटणें फुटोन आपलेकडे संधान लाविलें; व मारवाडी यांजकडेही संधान लागलें. तेव्हां फक्त मोगली फौज मात्र च्यार हजार पर्यंत राहिली. तेव्हां तेथून कूच करून जैपूरप्रांतीं चालला. नंतर आपले फौजेनें निकड केली. तेव्हां पुढें निभाव न होय तेव्हां पाटण परगण्यांत लहान किला आहे, तेथें इसमाल्या व मारवाडी यांनी मुकाम केला. नंतर जेष्ठ शुद्ध दशमी व एकादशीस दोन लढाया जाल्या. त्याजकडील माणूस जखमी व ठार फार जालें. आपले कडील ही थोडे बहूत जाया जाले. सारांश तूर्त आपली फौजेची जरब त्यांजवर चांगली आहे. राजश्री बापूजी होळकर व कासिबा होळकर पुढें फौजसुद्धां आहेत. हालीं राजश्री आलीबहादर यांजकडील फौज दोन हजार राजश्री सदाशिवपंत यांचे चिरंजीव बलवंतराव याजबराबर देऊन रवानगी केली. सारांश तिघांही सरदारांचे चित्त शुद्ध नाहीं; आणि मसलत तरी उभी राहिली आहे, म्हणोन लिं तें व फडणिसीचे कान् कायद्याचें बोलणें होऊन यादी ठरल्या आहेत, त्याजवर मखलाशा होऊन खाशाचा करार करून द्यावयाचा आहे, तो जाला म्हणजे सेवेसी तपसीलवार लिहून पाठवू म्हणोन; व तुमचें राहणें तूर्त च्यार महिने जालें, पुढें येणें कधीं घडेल पहावें, म्हणोन; लिहिलें ते सविस्तर कळलें. त्यास, सांप्रत इस्मालबेगाचाही मोड जाल्याचीं पत्रें आलीं आहेत. त्यावरून पाटीलबावा यांची निष्ठा श्रीमंतांचे पायासी आहे त्यापेक्षां अशाच गोष्टी घडतील. संतोष जाला. पुढें होईल तें ल्याहावें. फडणिसीचे कायद्याचे यादीवर करार होणें. त्यास, तुह्मांस जाऊन किती दिवस जाले, तेव्हांपासून करार होतच आहे. आणि पाटीलबोवाचा व आमचा भाऊपणा. त्यापक्षीं इतके दिवस लागूं नयेत. करार जालेच असतील. लिहून पाठवावे. तुह्मांस पाटील बावांनीं ठेऊन घेतलें म्हणोन, त्यास कांहीं कामाकाजाचे दिवस असतील म्हणून राहविलें असेल. उत्तम आहे.