पत्रांक ३५४
श्री १७१२ वैशाग्व शुद्ध ९
श्रीमंत राजश्री बाबासाहेब साहेबाचे सेवेसीः-
आज्ञाधारक अंबाजी इंगळे रामराम विज्ञापना येथील क्षेम ता छ ८ माहे शाबान येथें महाराजाचे कृपेकडून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. राजश्री जगोवा बापू आह्मांस येथे ठेवून गेले. लोकांची निते धरणी. लोकांचें मनांत कज्या करावा हे मानस पाहून, येथेंच च्यार रोज राहावें हे सांगोन, मथुरेस जावयास गेले. सरकार-किफायतीची गोष्ट सांगितल्यास लोकांस वाईट दिसती. त्यास धण्याची आज्ञा आली तर च्यार रोज मेवाडांतून कामकाज करून येईन. येथें रिकामे बसोन काय करावयाचें आहे ? त्यापेक्षां मेवाडाचें कामकाज आटोपोन धण्याचे पायाकडेस येईल. त्यास मेवाडांत जावयाची आज्ञा जाहाली पाहिजे. * बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.