पत्रांक ३५१
श्री. १७१२
सेवेसी विज्ञापना ऐसीजे. इकडील वर्तमान तरीः टिपूनें कोयेमुदुराजवळ छावणी केली. आयाज वगैरे नायेमार झाडींत आहेत. परंतु नायेमाराचे लोक फार जाया केले. त्याचा चिलर उपद्रव आहे. परंतु बाहेर येऊं सकत नाहींत. कित्येक आनंतशयेनच्या सरहदेस गेले ह्मणावयाचें वर्तमान टिपूनें ऐकून पहिलेपासून त्या स्थलावरी दांतच आहे. याविषयीं कांहीं हो, तें स्थल घ्यावें ह्मणून तजवीज करून फौजेची तयारी आहेच, त्यांतही मुलकांतील फौज जमा करीत आहेत. अनंतशयेनचे सरहदेस लागून फौज उतरविली आहे. हें वर्तमान तेथील राज्यास कळून, तेही आपली फौज घेऊन आपले सरहदेंत उतरले आहेत. हामेशा इंग्रेजी येक पटालबार रानांत होतीच. मध्यें गडबड जाहली, ते वेळेस दोन हजार बार आणखी पाठविला. तीन हजार बार मध्यें दोनी फौजेच्या उतरलेत. हें वर्तमान आत्रीस्थ गौरनरांनी ऐकून आपले हुशारींत लागलेत; आणि टिपूस पत्रें लिहिलींत कीं: तुह्मीं आमचे जमीदाराबराबरीं द्वेष वाढवून त्याचें मकान घ्यावयाची तजवीज केलियावरून पाहतां आह्मांसीच विरुद्ध करावें ह्मणून दिसोन येतें. तुमच्या आमच्या करारांत तें स्थल दाखल आहे ऐसें असतां, घडीघडी उपद्वयाप करणें युक्त नव्हे. जर करावें म्हणूनच असल्यास आह्मांस ल्याहावें. आम्हीही त्याचे कुमकेस सिद्ध आहों. यावरी जें युक्त दिसेल तैसें उत्तर पाठवणें. त्याप्रमाणें आह्मी अमलांत आणूं. याप्रमाणें पत्र गेलें आहे. याचे उत्तराची मार्गप्रतिक्षा करतात. दुसरे आपले तयारींत दारूगोळे वगैरेच्या सरंजामांत आहेत. यावरी जैसें होईल तैसें सेवेसी लिहिजेल. भटाचे घरचें वृत्त. अवघी बचबच आहे. मित्रही कामांत फिरतात. परंतु त्याचीही निभावणुकेची खातरजमा होत नाहीं. ऐसें काम बिघडलें. सेंजणास वसूलबाकीस गतवर्षीचे वसूल देणें. तेव्हां हाल विद्येमानची गती काय ? असो. सर्वत्र हेंच म्हणतात जे, पुन्हां जेनपद स्वेताकांत होईल. ईश्वरें क्षेम करावें. श्रेष्ट स्थलचे नृपास पैत्यभ्रमाचा उपद्रव फार जाहला होता. सबब पांच महिने काम आप्तर जाहलें. त्या समई लोकलाजें येतों म्हणून लिहिलें होतें. त्यास, तेथील लोकांनी उत्तर पाठविलें कीं, तुम्ही येक वर्षी तेथें असणें. ऐसीं पत्रें रवाना जाहली. इतकियांत केमल निघोन गेला. तदनंतर पत्रें येऊन पावलीं. त्यांवरून पाहतां नूतन यावयासी च्यार दिवस लागतील, ऐसें दिसतें, यावरी च्यार महिने जाहाजें यावयाचा हंगाम राहिला. यावरी पाहावें. जैसें मागाहून वर्तमान येईल तैसें सरकारचे जोडी बराबरी तपासिलें लिहिजेल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.