पत्रांक ३४१
श्री १७११
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेसी:- विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असलें पाहिजे. विशेष. आपण पत्र राजश्री बाळाजी भिकाजी याजबरोबर पाठविलें तें पावले. राजमंडलचे तैनातीचा व वर्षासनाचा ऐवज पावत नाहीं, व एखतपुरचा मा।र लिहिला व मारनिलिनें सविस्तर सांगितलें, त्याजवरून कळलें: ऐशास, आपले लिहिल्यावरून, राजश्री हरीपंत यांस वर्षासनाचे ऐवजाविशीं सांगितलें आहे; व सरकारची सनद येक हजार रुपयांची सालाबादचे ऐवजाची मा।रनलेस दिली आहे. सनदेप्रमाणें आपल्यास ऐवज पावता करतील व इनाम गांवचाहि बंदोबस्त करून देतील. * लोभ असो द्यावा. हे विनंति.