पत्रांक ३४०
श्रीगजानन १७११ फाल्गुन वद्य ८
रु
पो छ २५ रजब तिसैन.
श्रीमंत राजश्री नाना साहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक विश्वासराव आपाजी, दि।। देवराव महादेव, कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. येथील वर्तमान ता। छ २१ माहे जमादिलोखर मु।। दौंड स्वामींचे कृपेकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. कृपा करून छ ७ जमादिलाखरचें पत्र पो तें पावलें. सेवकास सनाथ केलें तेणेंकरून आनंद जाला. यानंतरी येथील वर्तमान छ १८ तारखेस नवाब अकबरआलीखान यांची पत्रें व अखबार घेऊन येक नाजर मोहबत आबजू कासीहून आला व बकसीनवाब मुंत्पाददौला त्यांचा पुत्र मुबारकदौला ऐसे उभयतां हिंदुस्थानांतून आले. त्यांणीं तिकडील अखबार आणिली आहे. त्यांत वर्तमान तरीः राजश्री पाटीलबावाचा मुलगा श्रीमथुरेवर आहे. इकडून सरकारची पत्रें व स्वामीची पत्रें गेली कीं, त्रिवर्ग सरदारांनीं येकचित्तानें असून मसलत करावी, द्वैत नसावे; व हिम्मतबहाद्दर यास सरफराज ठेवावें. त्यावरून पाटीलबावा बोलिले कीं, आह्मीं श्रीमंतांचे आज्ञेशिवाय नाहीं, परंतु नवाब आलीबहाद्दर ऐकत नाहींत, त्यास आमचा उपाय काय. हिमतबहाद्दर येक दिवस आपला गळा कापून घेत होता. तेव्हां आलीबहाद्दरबावास खबर जाली. त्यावरून तेथें गेले, आणि मारनिलेचे हातची सुरी घेतली. बहुत खातरखा केली. खर्चाची तकलीफ होती. यावरून, कांहीं खर्चास व वस्त्रें त्यांचे जनान्यास नक्ती त्यावरून, कांहीं पशमीना शालजोड्या वगैरे जिनस किनखाप पा दिल्हे. आणि आलीबाहाद्दरबावा, पाटीलबावांचे गुरुबंधु तेथे आहेत, त्यांचे डे-यास गेले होते. त्यास, त्यांजला हें वर्तमान साकल्य सांगितलें कीं, बावा ऐकत नाहींत, आणि हिंमतबहादर आज आपला गळा कापून घेत होते, त्यास आमचा उपाय नाहीं, बावाचा निग्रह भारी त्यास काय करावें, त्यावरून फिकीर. बावा स्वार होऊन पाटीलबावांचे डे-यास गेले आणि सांगितलें कीं आलीबहादरबावा तेथें आले आहेत, तरी आपणही चालावें. त्यावरून पाटीलबावा व राणेखानभाई स्वार होऊन गेले. उभयेतांच्या भेटी परमलोभानें जाल्या. बहुत लोभाची बोलणीं झालीं. मग पाटीलबावांनी बावांस हातीं भरून आपले डे-यास नेलें, परम शिष्टाचार केला. वस्त्रें वगैरे जवाहीर अकराखोन तयार करून हाती घोडे दोन ऐसे आणिलें. परंतु बावांनीं कांही घेतलें नाहीं. आतर, पानदान मात्र घेतलें, आणि स्वार होऊन आपले डे-यास दाखल जाले, वरकड तुभाभाई फिरंगी याचे नवे पलटणें याची तयारी जाली आहे. त्यावरून बावास त्याची कवायत दाखवायास बोलाविले. त्यावरून सुभेदारांस बोलाऊं पों कीं, पलटणें पाहावयास आपणही चालावें. त्यास सुभेदारांनीं निरोप सांगोन पों कीं, आमचे येथें लोकांचा गवगवा बहुत जाला आहे, यास्तव येणें होत नाहीं, आपण जाऊन पाहावीं. ऐसें सांगून पो. आणि आपले लोकांस सांगोन पों कीं, तुह्मी येऊन हांगामा करणें. त्यावरून लोकांनी येऊन हांगामा केला. पाटीलबावा पलटणाची तयारी पाहून बहून खुशवक्ती जाली. मग स्वार होऊन डेरेदाखल जाले. रा। कासीबा होळकर दिल्लीस गेले आहेत. मुलाजमतीस शाहानिजामुद्दीन यांणीं येऊन अर्ज केला कीं, मुलाजमतीस चालावें. त्यावरून बोलिले कीं, रो पाटीलबावाप्रों आमचा मान व त्या सिरस्त्याप्रों खीलत वगैरे द्यावें, तरी येऊं, नाहीं तर सांप्रत येत नाहीं. त्यावरून शहाजीनें विनंति केली कीं आज्ञेसिवाय मी नाहीं, परंतु हुजुरांत सांप्रत खर्चाची तकलिफ बहुत आहे, यास्तव लाच्यारगी आहे, नाहीं तरी गुंता नाहीं. मग कासीबांनीं सुभेदारांस पत्रें पो कीं, मुलाजमतीचा प्रकार याप्रमाणें आहे. त्यावरून सुभेदारांनीं लिहून पों कीं, तूर्त मुलाजमतीस न जावें, पुढें आह्मी लिहून पा। तेव्हां जावें. त्यावरून महकूफ राहिलें. दिल्लीहून खोजे जादे जैपुरास गेले होते. तेथून जोतपुरास गेले. शहरापासून येक कोस बाग आहे. तेथें मुकाम करून आहेत. राज्यांनीं सिष्टाचार मात्र केला. परंतु मुलाजमत अद्याप जाली नाहीं. राजे बिजेसिंग यांचा दिवाण आहे. त्याणें कांहीं वर्तमान जैपूरकरास लियों. त्यावरून दिवाणावर इतराज बहुत आहेत. जैपूरवालेही आपले फौजेची तयारी करून आहेत. जोतपूरवाल्याकडीलही फौज रवाना कुमकेस जाली आहे. दिल्लीत डाके नित्य पडतात- शहरांत बंदोबस्त चांगला नाहीं. पातशाई सलातीन आहे. त्यांस उपोषणें पडतात. वस्त्रें नाहींत. रात्रौ सीतानें हैराण, तेव्हां पातशाहांनी कांहीं रजया खरीद करून पा। दिल्या. याप्रों दिल्लीचें वर्तमान लिं आहे. त्याप्रों पाटीलबावाचे वगैरे लस्करांत नित्य चो-या होतात. घोडीं, उंटें नेतात. सावकाराचें दुकान फोडितात. ऐसी प्रकार आहे. वरकड, येथील वर्तमानः हुताशनीचा समारंभ वा। ५ पंचमीस राजश्री बळवंतरावजी यांणीं रंगाची तयारी करून कुसुंबी रंग व केशराचा व फुलांचा वगैरे गुलाल सर्व साहित्य घेऊन सर्व मंडळी सुधा शाहाजादे यांचे हुजूर दिवानखासांत समारंभ च्यार घटका नाचरंग जाला, बहुत संतोष जाले. मग नबाब अकबरआलीखान याजकडे दोन घटको नाचरंग होऊन, सांईकालीं आपले घरास आले. सेवेसी श्रुत व्हावें, जालें वर्तमान तें सेवकानें लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ केला पो हे विज्ञापना.