पत्रांक ३३८
श्रीगजानन
पो छ २५ रजब, तिसैन. १७११ फाल्गुन शुद्ध ६
रु.
श्रीमंत राजश्री-नानासाहेब स्वामीचे सेवेसीः--
विनंति सेवक विश्वासराव आपाजी, दि।। देवराव महादेव कृतानिक सां।। नमस्कार विज्ञापना येथील वर्तमान ता छ ५ माहे जमादिलाखर मु।। गारदौंड स्वामींचे कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. स्वामींनीं कृपा करून छ १५ जमादिलावलचें पत्र पा। सेवकास सनाथ केलें. तेणेंकरून अत्यानंद जाला. यानंतरीं येथील वर्तमान, रो लाला फत्तेचंद तेथून आज्ञा घेऊन निघाले ते येथें छ २० तारखेस पावले. त्रितीय प्रहरीं मिर्जा मुजफरबक्त शाहाजादे यांचे मुलाजमतीस राजश्री बळवंत रावजी, लालमुनशी वगैरे सर्व मंडळी गेलों. मुलाजमत जाली. खैर आफीयत मिजाज खुसीचें वर्तमान श्रीमंतांचें व स्वामीचें पुसिलें. नंतर लालानीं वर्तमान मुफसल हिंदुस्थानचें वगैरे निवेदन केलें. दोन घटका दिवानखान्यांत होते. मग, नबाब अकबर आलीखान यांची भेटी जाली. परस्परें खैरआफीयतचें बोलणें जालें. च्यार घटका बसून सायंकाळीं आपले घरास आले. दुसरे दिवशीं छ २१ तारखेस लालफित्तेचंदजीस बोलाविलें. मग मा।रनिले नबाब यांसीं हजर जाले. वर्तमान पुसिलें कीं, आतां आह्मांस श्रीमंत बंदोबस्त करून रवाना कधीं करितात? हिंदुस्थानचा रंग दिवसोदिवस बिघडत चालिला. मुलकाची खराबी होत आहे. दंगा मिटत नाहीं. यैसा जाला आहे. त्यास, आह्मी येथें उगेंच बसलों आहों. तरी कांहीं काम आम्हांकडून घ्यावें. म्हणजे आह्मांत कांहीं माणुसकी आहे किंवा नाहीं हें ध्यानास येईल. इसमालबेग कोठील कोण ऐसें असतां पन्नास हजार फौज बाळगून कजागी करितों. त्यापक्षीं आमचे पदरीं तरी नांव आहे. तरी आपला उपराळा मात्र असावा. मग चिंता नाहीं. खातरसा हिंदुस्थानचा बंदोबस्त आपले प्रतापानें करूं, व राजे रजवाडे इसमालबेग हे सर्व आमचे संधानांत आहेत. ऐसें विस्तारें बोलणें जालें. परंतु त्यांतील मुख्य भावगर्भ हा कीं, आमचे खर्चाची वोढ, यास्तव सत्वर बंदोबस्त करून रवाना करावें. दिल्लीहून खोजेजादा निघोन जैपुरास नेला. त्यास रजवाडे व उदेपूरवाले यांचें येक संधान होऊन, खोजेजादे यांस सन्मान करून ठेविलें आहे; व गाजुदीखान शाहाकडून फौज घेऊन बिकानेरावर आला आहे. त्यास राज्याकडील वकील गेले आहेत कीं, तुम्ही येऊन सामील व्हावें. खोजेजादे येथें आले आहेत. त्यास यांजला मुखतयार करून विजारतचा कारभार आपण करावा, हें एक राजकारण नवें निघाले आहे. त्यास या प्रसंगी आह्मीं गेलों तरी हा बखेडा कांहीं होऊं पावणार नाहीं. आपले प्रतापानें दिल्ली, दक्षणहिंदुस्थान एक होईल. याप्रमाणें भाषण जालें. मग लालांनी आज्ञेप्रमाणें उत्तरें चांगली केलीं कीं, उतावळी न करावी. काम मोठे आहे. यास्तव सोईनें सर्व मर्जीनरूप होईल. याप्रमाणें त्यास नवाबांनी जे समयीं धडपसरचे मुकामीहून कुच जालें, त्या समई लालाफत्तेचंद यांजपाशीं सात दफांची यादी लिहून दिल्ही होती कीं, श्रीमंत कैलासवासी भाऊसाहेबांनीं जुवांबक्तशहाजादे यास वलीअहद करून बसविले होते व तोच इरादा धरून आह्मी आपलेपाशीं आलों आहों. ऐसी खर्चाची तकलीफ व शाहाजादे यांचें लग्नसंबंधी वगैरे सात कलमें लेहून दिल्हीं होतीं. त्यांचें उत्तर काय करून आला ह्मणून पुशिलें. त्यास, लालांनीं आज्ञेप्रमाणें साकल्य सरकारचा उपर राखून, त्यांची मर्जी संतोष वाटे ऐसीं उत्तरें केलीं. तीं लालाफत्तेचंद समक्ष पायापासी विनंति करितील, त्यावरून ध्यानारूढ होईल. सेवेसी श्रुत व्हावें. मी गरीब निराश्रित आहें. माझी शरम स्वामीचे चरणास असे. बहूत काय लिहो ? कृपा लोभाची वृद्धि असावी हे विज्ञापना.