पत्रांक ३३३
श्री १७११ पौष वद्य १२.
विनंति सेवक गणेश हरी मुक्काम आंकलेश्वर कृतानेक सा नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। छ २५ रा।खर पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकरून शेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. फत्तेसिंगराव गायकवाड यास समाधान नव्हतें. त्यास पौष वा। ९ * नवमी मंदवारीं पहाटेच्या च्यार घटका रात्रीस देवाज्ञा जाली. भडोचकर सावकाराकडे बडोद्याहून बातमी आली. त्यांणीं आह्मांकडे सांगोन पाठविलें. त्यावरून आइकिलें, वर्तमान स्वामीस कळावें, याजकरितां वर्तमान आइकतांच काल संध्याकाळचे घटकेस सा घटिका दिवसास कागद लिहून जासूद जोडी पांचवे दिवशीं स्वामीकडे जाऊन पोंहचावें असा करार करून, रवाना केली आहे. परंतु, आमचा कारकून बडोद्यास आहे. त्याचे पत्र आलें नव्हतें. तें आज उद्यां येईल, तेव्हां सविस्तर लेहून पाठवीन ह्मणोन, त्या पत्रीं लि।। आहे. त्यास, त्याच दिवशीं संध्याकाळी आमचे कारकुनाचें पत्र व दुसरें अमोदकराचें पत्र ऐ।। दोन्ही वर्तमानाचीं येऊन पावलीं. तींच स्वामीकडे पाठविलीं आहेत. त्यावरून विदित होईल. ईश्वरीसत्ता प्रमाण! यास कोणाचा उपाय नाहीं. परंतु त्या प्रांतीं मवासास फत्तेसिंग याचा जबाब चांगला होता, त्याप्रमाणें नवा बसोन बंदोबस्त होई तों महीकाट्याचे वगैरे मवास उचल करितीलच. परंतु, सरकारची फौज या प्रांतीं आलियामुळें दबाबानें मवास उचल करूं पावणार नाहींत. परंतु, प्रसंगोपाद दंगा जाहल्यास इतक्या फौजेनें बंदोबस्त होणें जमीयेतीप्रमाणें होईल, याजकरितां भरणा पोख्त असावा. या प्रांतीं कांहीं सरंजाम आणि सरदार मर्द आणि मनसेबेयानें चाले असा असल्यास राजकारणाचे उपयोगी पडेल. मग, स्वामीची मर्जी. पुण्यांत फौज आहे तसी या प्रांतीं राहील. राजश्री रामचंद्र भास्कर याचीं पत्रें पुण्यास गेल्याचें वर्तमान आइकिलें. गेलीं असतील. मी आंकलेश्वरी प्रस्तुत आहें. वासद्याकडे जाणार. परंतु च्यार दिवस वाट पाहून मग जाईन. तिकडें पत्रें पाठविलीं आहेत. उत्तर येईल त्याजप्रों करीन. उरपाडेस कारकून पाठविला आहे. परंतु कमावीसदार याद द्यावयास अनमान करितो. तेव्हां निकड करणें प्राप्त. ते बोभाट लिहितील. यास्तव विनंति लि।। आहे. राजश्री असाराम विनायक मातबर सावकार भडोचकर यांणीं दुकान जंबुसरीं घातलें. त्याचा मजकूर आलाहिदा पुरवणींत लि।। आहे. त्यावरून विदित होईल. उत्तराची आशा जाहली पाहिजे. शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.