पत्रांक ३३२
श्री १७११ पौष वद्य ११
श्रीमंत राजश्री दादा स्वामीचे शेवेसी. विनंति विज्ञापना. बडोद्याहून च्यार घटका दिवसास नारोपंताची चिठी आली. सेनाखासखेल यास पौष वद्य नवमी मंदवारीं च्यार घटका रात्रीस देवाज्ञा जाहली. रविवारीं अग्निसंस्कार जाला. गुंता नाहीं. यामागें वर्तमानें येत तसें हें नाहीं. निश्चयरूप गोष्ट ईश्वरें घडविली. पुण्यास हें वर्तमान सा रोजांत जावें. पुण्यास ल्याहवयाचें काव्यांत वगैरे हुल्लड येकदां होईल त्यास मारवाडी सिंदी झाडून रवाना करावें. सरदार गेला. धनी नाहीं. फितूर माजलें. मानाजी गायकवाड यास आणावयास माणसें गेली, नारोपंताची चिटीच पाठविली आहे. रा। सोमवार पांच घटका दिवस चढतां जंबुसराहून रवाना केलें. कोणे वेळेस आपणाजवळ पावतील ती वेळ ल्याहावी. आपण च्यार रोज आंकलेश्वरापुढें जावयाचें करूं नये. सरंजाम जवळ असों द्यावा. सरदार गेल्यानें घालमेल होईल. शहरचा बंदोबस्त आहे; परंतु फितुर बहुत. सरकारांतून सरंजाम या प्रांत येतो तर चांगलें. हा प्रसंग आहे. पुण्यास सा रोजांनीं वर्तमान पोंचल्यास चांगलें. हे विनंति.