पत्रांक ३२९.
पो आश्विन वा १३ सा तिसैन
श्री १७११ आश्विन शुद्ध ८
शेवेसी कृष्णाजी जनार्दन ओक मो जंबूसर कृतानेक सा नमस्कार विज्ञापना ता। अश्विन शु।। ८ पावेतों यथास्थित असे. विशेष. मी जंबुसरास आलियावर आपले लिहिल्याप्रमाणें अजमासाची सरकारांत निकड आहे, त्यास, पत्र देवावयाची आज्ञा जाली पाहिजे, म्हणोन राजश्री दिवाणजीस विनंति केली. त्यावरून त्याची सालमा।रचे मखत्याप्रो साडे तेवीस हजार रु।। जमा धरून, आपले फाजील बाकीसुद्धां सतरा हजार येणें. त्यापैकीं जमेंत खर्च वजा होऊन, बाकी सा हजार रु।। फाजिलास टाकून, बाकी दहा हजार रु।। सरभुवनची रसद मेहेंदळे याजपासून घ्यावी, म्हणेन सरकारांत विनंतीपत्र लिहून पाठविलें. ते समई पाऊस पाणी चांगला प्रथमता लागों लागला. तेव्हां फारच पडिला यामुळें भाताचे तरु टाकिले त्याची तसनस जालियामुळें कपारी थोड़ी बहुत पडिली. तरूंची घट आली. पुढीं पाऊस ज्वारींचे पेरणीस चांगला उघडला. पेरण्या झाडून जाहल्या. नंतर मघा लागल्यापासून संतत पाऊस पडतो. येक दिवस उघडत नाहीं. यामुळें ज्वारी कुजोन गेल्या, व पेस्तर सालाकारणें किस्तंकार ढळिया पडावयाचा तो राहिला. येविसींचा मार सुभा समजाविला. त्यावरून येविसी सरकारांतही त्याची विनंतपत्र लिहून पाठविलें तें पावलेंच असेल; व त्या जासुदाबरोबर आपणही विनंति लिहिली आहे. हालीं उत्तराचा एक चरण राहिल्यापासून पाऊसांनी उघाड दिली आहे. परंतु रेचावड जमिनीची ज्वार दरोबस्त गेलियामुळें पांचचार हजारांचें नुकसान रयतेस मजुरा द्यावें लागेल. तेव्हां फाजिलास ऐवज नेमिला तो राहणार नाहीं. गुदस्ता च्यार हजार रु।। रदकर्जिस नेमिले. परंतु, आफतीमुळें व कौली लावणी सुभाहून जाली सा।, कमी आकार होऊन रदकर्जास ऐवज राहिला नाहीं. रसदेचे पैकीं फाजील राहिलें. सालमजकुरींही याप्रमाणें जालें. याज करितां सरकारांत विनंति करून, कांहीं ऐवज रसदेपो कमी करून, फाजिलास लाऊन द्यावा. शेवेसी श्रुत होय, हे विज्ञापना.