पत्रांक ३२१
श्री. १७४५
यादी महिपतराव कृष्ण साठे व यशवंतराव परशुराम परांजपे सु।। अर्बा अशरीन गया तैन व अलफ. कारणें अर्जी लिहिली ऐसीजे. कैलासवासी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांणीं आमचे आजे पणजे यांस पुण्यास आणून व तैनात सालीना रु० दहा हजार करून मामले वगैरे कामकाज सवाईमाधवराव साहेब यांचे कारकिर्दी पावेतों हरएकाविसी चालवीत गेले. व वडिलांचे कारकिर्दीत राजे रजवाडे व सरंजामी व सरकार पेशवे यांजकडे ऐवज येणें व लोकांची देणीं शके १७१७ पावेतों होत आलीं. नंतर श्रीमंत बाजीराव साहेब पुण्यास येऊन कारभार राज्याचा करूं लागले. त्यांणीं आह्मांसी वांकडें मनांत ठेविलें कीं सवाई माधवराव यांचे आप्त यांचें नीट नसावें. ह्मणोन आमचा सावकारी व्येव्हार दरोबस्त बुडाला व तैनात सुद्धां बंद केली. व कामकाजें काहाढली. यामुळें दरोबस्त आमची खराबी जाहाली. वस्तीस मुखवस्तु राहिलों. त्यांत होळकराने खंड घेतला. ते समई दरोबस्त गेलें. आणि पंचवीस वर्षे बे रोजगार. उभयतां कोण्ही पुस्तपना राखी असा नाहीं. तशांत कुंपनी सरकारांतूनही सर्वास सरंजाम व कोणास पगार व कोण्हास इनाम चालाविलें. आणि आपली अनास्था केली. एक गांव करवीरकरांकडून इनाम तो चालविण्याविशीं पांच वर्षे साहेबांचे कानावर घातलें. चकत्याही हुबळी धारवाडास दिल्ह्या. परंतु अद्यापि गांव पदरीं पडत नाहीं ! आणि हल्ली आह्मांवर सावकार फिर्याद देऊन अर्ज्या देतात. त्यांसीं जाबसल करावयास कोण्ही कारकूनही जवळ राहिला नाहीं व देणें ज्याचें ते आबरु ठेवित नाहींत. या करितां साहेबीं मेहेरबान होऊन आह्मीं निराश्रित, आह्मांस सावकाराचें देणें याविसीं तोशीस न लागे आबरु राहोन साहेबाचे वस्तीस कांहीं दिवस काळ कंठे असें जाले पाहिजे. दुसरे कोठें जावें तरी ठिकणाही नाहीं. व जवळ अर्थ कोण्हे विसींच राहिला नाहीं.