पत्रांक ३१८
श्रीलक्ष्मीकांत. १७३७ आश्विन शुद्ध ६
पो छ ४ जिल्काद, आश्वीन शुद्ध ६ शके १७३७ मु।। पुणें सु।। सीत अशर.
राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
छ अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मी पत्र पाठविले ते पावलें. लिहिला मजकूर कळला. त्यास, त्याचीं उत्तरेंहि पूर्वी पाठविलींच आहेत. तीं पोहचून मजकूर समजलाच असेल. रांगडा ब्राह्मण याजबराबर तुह्मीं चिरंजीव राजश्री बाबा याजकरितां आंगारा पाठविला तो पोंहोचून, तुमच्या लिहिल्याप्रमाणें चिरंजीवास आंगारा लाऊन त्याचा गुण कसा काये तोहि पाहण्यांत आला. हा सारा तपशील ब्राह्मणाचे समक्षच जाला आहे. व सांप्रत तोच ब्राह्मण माघारें आला आहे. जबानीं तुम्हांस सविस्तर सांगेल, त्याजवरून कळेल. रा। छ ५ माहे शवाल, * बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसूद.