पत्रांक ३१६
श्री १७३६ आश्विन शुद्ध १
राजश्री नारायणराव गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीयें कुशल लिहित जावें. विशेष. दारकूजीनाईक गायकवाड यांणीं सरकारांत विनंती केली कीं, मौजे पिंपळगांव सराई, पा। देउळघांट, वे मौजे आनंद, पा। जाफराबाज, व मौजे रुईखेड, पा। चांडोल, हे तीन्हीं गांव माझे पाटीलकीचे आहेत. या गांवांपैकीं, देउळघाट व जाफराबाद या दोहों महालांची वांटणी गांवगन्ना जागीरदार मोकासदार, सरदेशमुख बाबते वगैरेची जाली. त्या वांटणींत दों माहालचे गांव जागीरदारांचे हिशांत लागले. एक रुइखेड, मात्र, सामलांतींत आहे. त्यास, हरदो गांवास जागीरदारांचा मनस्वी उपसर्ग लागतो. कौल एके रीतीनें द्यावा आणि वर्तणूक मनास येईल तैसी करावी! या चालीचे पोटांत रयेतीचे व आमचे घरांत वसीयेत राहिली नाहीं. रुईखेड तो जुमल्यांत! तेव्हां तेथें सर्वत्रांचाच उपसर्ग होतो. याजमुळें नांदणूक न होतां, गांव खराबींत आले आहेत. वृत्तीचा विशय, तेव्हां गांवचा बंदोबस्त असावा, यास्तव हे तीन्ही गांव मल्हार रेणूराव यांचे चिरंजीवानीं राजश्री राणे गोविंदबक्ष यासीं बोलून गांवचा इस्तावा सांत सालां करून, करार करावा आणि बंदोबस्त करून घ्यावा. बलकी, आपले आंगीं लाऊन घेतल्यासारखें करावें, ऐसें जाल्यास गांव आबादीस येऊन वसायेत होईल व जागीरदाराचा वगैरे उपसर्ग लागणार नाहीं. इस्ताव्याप्रमाणें सरभरा आह्मी त्याची करूं. कारण, घांटमाथां अंमल राजश्री पंतप्रधान यांजकडील. तेव्हां मल्हार रेणूराव यांचे चिरंजीवास राजश्री सदाशीवपंतभाऊ यांणीं सांगितलें असतां, तेहि करून घेतील, ऐसें नाईकमजकुरांनी योजिलें आहे. याजवरून हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. व येविसींचा तपसिल राजश्री सदाशीव बापूजी व गंग्या तूपकर यांसीं लिहिला आहे. त्याप्रमाणें ते तुह्मांस समजावितील. तो समजून घ्यावा. व भाऊंसही पत्र लिहिलें आहे तेहि पावतें करून, उभयतांचे सांगितल्याप्रमाणें तुह्मींहि बोलून, ज्यांत यांचे गांवचा बंदोबस्त घडे तें करावें. नाईकमजकूर यांचे अगत्य सरकारांत किती, हे तुह्मांसहि माहीत व या करण्यांनीं यांचे गावचा बंदोबस्त होत आहे व कांहीं कोण्हाचे आंगावरहि बाबत पडत नाहीं. ज्याचा पैसा तोच देत आहे हें समजोन, तुह्मीं राजश्री सदाशीवपंतभाऊ याजकडून मल्हार रेणूराव यांचें चिरंजीवास सांगऊन, सदरहू लिहिल्याप्रमाणें यांचे गांवचा बंदोबस्त करून देवावा. रा। छ ११ माहे रमजान * दारकूजीची अगत्या येथें. तेव्हां राजश्री भाऊंस अगत्य सहाजच आहे, व नुकसानीचीहि गोष्ट नाहीं, व तेथील केल्यानीं हा बंदोबस्त घडेल, ऐसें समजोन लिहिलें आहे. तर लिहिल्या प्रो। चित्त पुरवून, बंदोबस्त जरूर करून घ्यावा. बहुत काय लिहिणे. हे विनंती. मोर्तबसुद. पो छ २९ सवाल, आश्वीन शुद्ध १ भृगुवार, शके १७३६