पत्रांक ३००
श्री १७१० वैशाख शुद्ध ६
वेदशास्त्र-संपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेशीः-
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सांं नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहित जावें. विशेष. तुम्ही चैत्र वद्य सप्तमीचें पत्र पाठविलें तें पावलें, वैशाख–मासीं राजश्री पंतप्रतिनिधी यांचे विवाहाकरितां क-हाडास येणार, असें ऐकिलें. त्यास, येते-समई सातारि-यास येऊन श्रीमंत माहाराज छत्रपती यांचे व श्रीमंत आईसाहेब यांचे दर्शन घेऊन जावें. त्यांचा हेत आपले भेटीविसी बहुत आहे. मार्गशीर्ष-मासीं आम्हीं आपले भेटीकरितां मेणवलीस आलों होतो, त्यासमई श्रीमंताचे येण्याविशीं बोलिलों होतों. त्यास, श्रीमंतांचे येण्याचा अर्थ आपण घडवीतील त्या समई घडेल, परंतु आपले येणें याप्रांतीं आहे, त्याअर्थी सातारियास येऊन राजदर्शन करून जावें, म्हणोन लि. तें सविस्तर कळलें, त्यास, सातारियास * यावयाचे होतें. परंतु, राणी वारल्याचें वर्तमान आलें. त्यास, बहुता दिवसीं येणे तें सुतकामुळें दूर बसावें, मजुरा करतां नये हे ठीक नाहीं, याकरतां न आलों. परभारे क-हाडास जातों. आपणास कळावें. रा। छ ४ साबान, लोभ असों द्यावा. हे विनंति.
पो वो शुद्ध ७ सोमवार सन समानीन.