पत्रांक २९४
श्री. १७०२ चैत्र वद्य ११
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्यराजश्री बळवंतराव दादाजी का।दार प्रांत कल्याण भिंवडी गोसावी यांसीः--
सेवक माधवराव नारायण प्रधान नमस्कार. सु। सबा समानीन मया व अलफ. रा। बाबाजी अनंत ढवळे यांचे तीर्थरूप अंताजी नारायण हे सन ईहिदे समानीनांत इंग्रजाचे लढाईत सरकारकामास आले. सबब, यांस दीडशें रुपये आकाराची जमीन, नूतन इनाम, कल्याण प्रांतीं, यांचे सोईस पडेल तेथें, नेमून घ्यावयाची सालगुदस्तां करार झाला आहे. परंतु सनद सादर जाली नाहीं. त्यास, हाल्लीं हे सनद तुम्हांस सादर केली असे. तरी सदरहु दीडशें रुपये आकाराची जमीन प्रांतमजकुरीं यांचे सोईस पडेल त्या गांवीं, नेमून देऊन, यांचे नांवें पेस्तर सालापासून इनामखर्च लिहीत जाणें आणि चतु:सीमेचा जाबता हुजूर लेहून पाठविणें. त्याप्रमाणीं इनामपत्रें करून दिल्ही जातील. प्रांतमजकूरचे अजमासास सालगुदस्तां व सालमजकूरचा दुसाला ऐवज तीनशें रुपये घ्यावयाची नेमणूक केली आहे. त्याप्रमाणें सदरहू रुपये जमिनीबद्दल यांस पावते करणें. जाणिजे. छ २५ जमादिलाखर,
आज्ञाप्रमाण.