पत्रांक २९२
श्री १७०८ पौष वद्य ५
सेवेसीं वेंकोजी अनंत शिर सां नमस्कार विज्ञापना तारा पौष वद्य ५ पावेतों स्वामींचे कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. आज्ञेप्रों स्वामींचें आज्ञापत्र राजश्री कृष्णाजीपंत यांस प्रविष्ट केलें. त्यांनीही सेवेसीं विनंतिपत्र लिहिलें आहे. त्याचा उद्धार होयसा केला पाहिजे. इकडील वर्तमान तर अविंध तळ कोंकण तलचेरी बंदरावर आहे, त्याची फौज आठ हजार खास पागा व सीलेदार दहा हजार व बार व कर्नाटकी प्यादे मिळोन साठ हजार व तोफा लहान मोठ्या दोनशें, याजपौ पांच हजार स्वार व पंधरा हजार बार वगैरे प्यादे व पंधरा तोफा लहान इतका जमाव सुधा बुरानदीन यास कित्तुरावर पाठविला. त्यानें कित्तुरचें काम करून तेथेंच होता. हालीं आपले फौजेची आवई पडल्यावर अविंधाचे आज्ञेनें हुबळीवर मुक्काम ह्मणून एकंदर परवाना आला आहे. आणखीं दोन परवाने आल्यावर तेथून कूच करून हुबळीस येईल. धारवाड, कोपल, गजेंद्रगड, बदामी, तुंगभद्रातीर धरून, इकडील मुलुकांतील कडबा जाळून टाकणेंविशीं ताकीद व जमीदार जागां जागांचे व त्याचे कारभार करणारास धरून कैद करून ठेवावे आणि उत्तरेकडील फौज कृष्णापार होतांच मुलुक तमाम जाळून जमीदारांस पटणास पाठविणेविशीं एक परवाना आला आहे. प्रस्तुत समय आहे. आवई न घालितां लष्करें तुंगभद्रेवर आलीं तर वैरण काडीही आहे. आणि जमादार लोकांचा बच्याव होत आहे, आणि खुद्द तिकडे शहास गुंतला आहे. चित्रकलदुर्गस आपली फौज येई तोंपर्यंत तो कांहीं इकडे येत नाहीं. तेथील शाह भारी पडला आहे. एक वेळ युद्धप्रसंग जाहला. मोड याचाच जाहला. म्हणून त्यास खोदून काढावें म्हणून बसला आहे. आपली फौज भारी होऊन आल्यास दुर्गचे मैदानांत आपणाकडून आणखी एक सरदार भारी जमावानिशीं पा।. लढाई करावी. तहकीक वर्तमान मुद्दाम ब्राम्हण जाऊन आपाजीरामाची राहुटीस ऐकोन आला. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.