पत्रांक २९०
श्री. १७०८ आश्वीन वद्य १२
राजश्रीयाविराजित राजमान्यराजश्री महिपतराव बापू स्वामीचे सेवेसीं:-
पो हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष तुह्मी छ १७ जिल्हेजचें पत्र पाठवलें ते पावोन संतोष जाहाला. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. फार दिवस पत्र आलें नाहीं, विस्मर जाहालें, ह्मणोन पत्र लिहिलें. ही गोष्ट खरी आहे. परंतु माझे शरीरास सावकाश नाही. यामुळें पत्र पाठविण्यास विस्मरण पडलें खरें. राजश्री रामचंद्र नाईक यांजवळ आपले प्रकृतीचें वर्तमान पुसत असतों तेही सांगत असतात. तेव्हां विस्मरण नाही. तुमची प्रकृती नीट असावी अशीच प्रार्थना ईश्वराजवळ आहे. तुह्मीं लिहिलें की, श्रीदेवाजवळआल्यापासून वीस दिवसांत सांप्रत बरी आहे. त्याजवरून अति संतोष जाहला. तुमची निष्ठा श्रीजवळ आहे. तेव्हां ईश्वर कृपाच करील. संदेह नाही. सेवा चालते त्याप्रों चालों द्यावी. सदैव पत्रीं कुशल वृत्त लिहीत जावें, आमचें प्रकृतीचें वर्तमान तर पोटांत दुखत असतें. उपाय करितों. चार दिवस बरें वाटतें, फिरोन नीट नाहीसें होतें. इलाज करीतच आहें. कळावें. रा। छ २५ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती. छ ४ मोहोरम.