पत्रांक २८८
श्री १७०८ श्रावण शुद्ध ११
राजश्री हरीपंततात्या स्वामीचे सेवेसीं :-
विनंति उपरी. भोंसल्यांचे दरमहाचे तीस हजाराहून मी अधिक बोलिलों नाहीं, व बोलत नाहीं. इतके द्यावे लागतील. देऊं. खासा पुण्यास येतील. त्यांस येथे मेजवानी स्वामींनीं केली. त्यांनीं आपणास केली. त्याजवर फिरोन गांट पडत्ये, तेव्हां श्रीमंतांचा निरोप व आपला घराऊ निरोप द्यावाच लागेल. दसरा जाहल्यावर मी येतों, अगर सेनासाहेबसुभा यांस पाठवितों. ऐसें शपथ पूर्वक बोलून, आपलें काळीज आमच्या हवालीं करून गेले आहेत. शफत वाहिली, याजमुळें करतीलसें दिसतें. स्वामीची गांठ पडल्यावर या गोष्टी निघतील. फिरोन खचित करून घ्यावें, याचा उपयोगअनुपयोग फारकरून समजला. परंतु, मसलतीवर दृष्ट, त्यापक्षीं च्यार खरकटीं बाळगलींच पाहिजेत. मंडल्याविशीं श्रमी आहेत. येविशीं बुंदेल्यांस निक्षून लिहून, यांचे स्वाधीन होय, तें करावें, सर्व अर्थ ध्यानांत आहेत. ल्याहावेंसें नाहीं. ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. त्यास, धुरंधर येथें आले. श्रीमंतांचा निरोप व आह्मीं आपला घराऊ निरोप, वस्त्रें, जवाहीर, हत्ती, घोडे योग्यतेप्रमाणें केले. त्याणींही आपल्या योग्यतेप्रमाणें केलें. येविशींचा वगैरे सविस्तर मजकूर छ २७ रमजानीं लिहून तुह्मांकडे पाठविलाच आहे, त्यावरून कळेल. खरकटीं बाळगावयाची संवय तुह्मांस आहेच. त्याप्रों घडतही आहे. मंडळ्याविशीं पत्रें लिहून कारकून व हुजरे हाल्लीं रवाना केले. रा। छ २ सवाल. हे विनंति.
पो। छ १० शवाल, प्रातःकाल, श्रवण, सबा समानीन.