पत्रांक २८७
श्री १७०८ आषाढ वद्य ३
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री महिपतरावबापू स्वामीचे सेवेसीं:-
पोप्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. पत्र पाठविलें तें पावोन बहुत समाधान जाहलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. शरीरप्रकृतीविशीं लिहिलें. त्यास औषध घेत असतों. मातुश्री ताई तेथें आली होती. त्यांणीं प्रकृति पाहिली त्यापेक्षां आतां प्रकृति दिवसेंदिवस चांगली आहे. श्रीकृपेंकरून आरोग्य होईल. तुह्मीं येण्याचा मजकूर लिहिला तो कळला. श्रीस प्रार्थना करून यावयाचें करावें. मुरबा कोहळ्याचा पाठविला तो पावला. वैद्यास पुसून घेतो. कळावें. रा। छ १७ रमजान, बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.