पत्रांक २८६
श्री. १७०८ आषाढ शुद्ध ६
सेवेसी विज्ञापना, आपली स्वारी येथे असतां टिपूकडील शृंगेरीपंत राजश्री मुधोजी भोसले यांजकडे आला. त्याजबराबर भोसल्यांनी आपलेकडील लालादुल्लभदास देऊन आज्ञा झाली. त्याप्रों मुद्दे सांगून पाठविले. ते अदवानीस टिपूकडे गेले. लष्कराबाहेर अर्ध कोसावर डेरा दिला. तेथें रहावयास सांगितले. दोन दिवस भेट जाली नाहीं. तिसरे दिवशीं सायंकाळीं बलाऊं पा।, पत्र दिल्हें, व वर्तमान सांगितलें. त्यास वरकडे कांहीं नाहीं, सालाबादी पैका राहिला असेल तो देऊं, त्यांत पायमली मजुरी द्यावी, बदामी घेतल्यानें तीस लक्षांची नुकसान झाली, असो, ती आह्मांकडे द्यावी. तुमचा नरगुंदचा किल्ला काळोपंत देतो, त्यानें पेशकसी करारप्रों द्यावी, कितुर तर आमचें खंडणीचे संस्थान, याप्रों भाषण जालें, तीन प्रहरपर्यंत बसोन तेचसमई निरोप दिला. पत्र लेहून दिल्हें. तें घेऊन, श्रृंगेरीपंत व लाला भनूचे मकामापलीकडे गेले. तों सेनाधुरंधर गेले. चिरंजीव येथें आहेत. त्यांजकडे जाऊन पत्र दिल्हें. वर्तमान सांगितले. त्याजवर तें पत्र व लालास आह्मांकडे पाठविलें. लालानें मजकूर सांगितला, तो लिहिलाच आहे. पत्रांत मजकूर स्नेहाचें फार लिहिलें होतें. दुसरें कांहीं नाहीं ! बोलण्याचा मजकूर उभयतांवर घालून लिहिला आहे. तें पत्र पाहून आह्मीं सांगितले कीं, टिपूचा आमचा फासला जवळ आहे. राजकारणांचा भाव समजला. त्यापक्षी, जाब लिहून देऊन लावून द्यावा. त्याजवर आह्मीं लालास पुसलें कीं, काहीं अधिक उणें सांगितलें आहे कीं, काय ? त्यांणी सांगितले की, सांगितला मजकूर इतकाच. तेव्हां रवाना करण्याचा निश्चय ठरला. त्यावर, शृंगेरीपंतानें सांगितले की, मजला मुधोजी बावासीं बोलावयास सांगितले आहे. त्यांची गांड पडली पाहिजे. तेव्हां पुसलें कीं, कागद पाहिला, तुह्मीं मजकूर सांगितला याहून अधिक काय बोलावयाचें ? त्यास, भेट जाली पाहिजे, हाच आग्रह. नाहीं ह्मणावें तर चिरंजीवास वाईट वाटेल, व लष्करांत नसावा, याजकरितां जाणें तर जा, ह्मणून सागितलें. त्यावरून मुधोजीबावाकडेस रा। केला. काय अधिक सांगते पाहावें. लष्करांतून पीडा लाऊन दिली. धुरंधराची गांठ पडल्यावर पत्र आलें ते दृष्टीस पडेल. त्याजवळ अधिक मजकूर काय सांगितला असेल तोही कळेल. राजकारणांचा प्रकार समजलाच आहे. परंतु कच्चें वर्तमान ऐकलें तें सेवेसीं लिहिलें आहे. रा। छ ४ रमजान. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना, लालाबराबर एक हत्ती व चार वस्त्रें पाठविलीं. हत्ती लंगडा आहे. तो चिरंजीवांनीं येथे चालेना ह्मणून ठेऊन घेतला. विदित झाले पाहिजे. हे विज्ञापना.