पत्रांक २८५
श्री १७०८ ज्येष्ठ वद्य १३
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री महिपतरावबापू स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. तुह्मीं छ २० साबानचें पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें, बहुत संतोष जाहाला. प्रकृतीचें वर्तमान लिहावें ह्मणोन लिहिलें. त्यास, तीस महिने जाहाले, वायूचा उपद्रव जाला आहे. मातुश्री ताई येथें आली होती ते समई प्रकृत पाहिली. त्याजवर औषध चाललेंच आहे. त्यास, अधिक उणी प्रकृत होते. अद्यापि ठरली नाहीं. उपाय करीतच आहों. ईश्वर * कृपा करील. तुमची प्रकृती चांगली आहे ह्मणोन लिहिलें. त्यास, ईश्वरानें कृपा केली. श्रीमंतांचे दर्शनास यावयाविशीं पूर्वी लिहिलें आहे. श्रीची आज्ञा घेऊन यावयाचें करावें. रा। छ २७ साबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंती.