पत्रांक २८४
श्री. (असलबमोजिब नकल.)
१७०८ ज्येष्ठ वद्य ११
विनंती ऐसीजे:-कृष्णापार रायचूरपावेतों नबाबाचे सरदारांसमागमें मी गेलों. श्रीमंत राजश्री गोविंदराव बापू व गोविंदराव भगवंत यांस नबाबांनी त्यांचे समागमेंच ठेविलें. कारण कीं, अदवानीचा महसरा उठविणें, त्यास उभयतांनीं विचार पाहिला कीं, पुढें छावणीचाही बेत उत्तम प्रकारें जाला पाहिजे. म्हणून हेही समागमेंच राहिले. अदवानीचें वर्तमान ऐकून व इकडून पत्रें गेलीं यावरून, श्रीमंत राजश्री तात्यांनी राजश्री आपा व रघुनाथराव व बाजीपंत अण्णा यांची फौजेसह रवानगी अदवानीचे सुमारें केली. हा सर्व तपशील बापूंनीं पेशजीं स्वामीस लिहिलाच आहे. ती पत्रें इंदापुरकडून स्वामीस पावलीं असतील. यानंतर, छ १७ साबानीं रायचुराहन निघोन छ २५ माहे मजकूरीं भागानगरास नबाबाकडे मी आलों. नासिरुलमुलूख व मुगरुलमुलूख व समशुमुलूख यांजपाशीं कोन्हेर बाबूराव यांस ठेविलें आहे. टिपूनें हल्ला केल्या तितक्या मोठ्या जुरमतीनें महाबतजंग यांनी मारून काढल्या. याचा तपशील पेशजी विनंती लिहिण्यांत आलीच आहे.
अलीकडील वर्तमान आलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें आहे. त्यावरून ध्यानास येईल. हे विज्ञापना.