पत्रांक २८१
श्री १७०७ माघ वद्य १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री शिवाजी विठ्ठल स्वामी गोसावी यांसी पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष, संस्थान करोली येथें सरकारचा अमल आहे. त्यास, संवत १८३९ पासून सरकारचे अमलाचा ऐवज येणें, त्याविशीं राजश्री माहादाजी शिंदे यांणीं ठराव करून दिल्हा. त्याजवरून संस्थानिकांनीं ठाणें मौजे कुतघोन व तर्फ मागदील ऐवजांत लाऊन दिल्हीं आहेत. त्यास, मौजे मारीं व तर्फमा।रीं सबलगडाकडील ठाणीं तुह्मीं घालणार, ह्मणोन हुजूर विदित जालें. त्याजवरोन हें पत्र लिहिलें असे. तरी संस्थानिकांनीं आपले संस्थानपैकीं मौजे मा।र व तर्फमजकुर सरकारचे ऐवजीं सरकारांत ठाणीं सुद्धां हवालीं केलीं असतां, तुह्मीं उपद्रव करणार, हें ठीक नसे. तुह्मीं ते प्रांतीं फौजसुद्धां असतां, सरकारचा अमल बसऊन द्यावा तो अर्थ न होतां, जाहाल्या अमलास खलेल करितां, हे गोष्ट उत्तम नाहीं. मौजे मा।रास व ता। मा।रास तुह्मीं कोणेविशीं उपद्रव न देतां, सरकारचे ऐवजाचा झाडा होऊन येई तें करणे. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ २६ रबिलाखर, सु।। सीत समानीन मया व अलफ. बहुत काय लिहिणे ? हे विनंती.