पत्रांक २७४
श्री १७०४ चैत्र
राजश्री सखाराम हरी यांसीः-
आशीवाद उपरी, बारभाईकडून संदर्भाचा मजकूर लिहिला. पांचांचे परगणे देणार, हजार फौजनशीं आपा अथवा जो यांतील मर्जीस येईल तो ठेऊन द्यावा, या अन्वयें लिहिलें. त्यासी, आह्मीं गंगातीरीं एकटें रहावें. त्यांण सारा दवलतीचा कारभार जवळ करावा. तेव्हां कोणाशीं बोलावयास कामास नये. रिकामें बोललों तरी तेंच निमित्य ठेऊन त्या माणसास धरून नेऊन पारिपत्य करावे. किल्यावर घालावें, तेव्हां आम्हांस राग यावा. राजकारण तरी करूं नये. ऐसें नाना उपद्रव सोसून रहावें, त्यापेक्षां दूर असावें. तेणेंकरून आह्मांस वाईट वाटणार नाहीं, त्यासही आमचें भय नाहीं. जवळ राहिल्यास परस्पर भय. निमित्य ठेऊन, आमचे माणसांचीं पारपत्यें करणार. याविशींचे अनुभव पूर्वी बहुत भोगिले आहेत. ते पांच देणार ते येथेंच पाठविले तरी काय वाईट ? आमचे मनांत भडोच अथवा सुरतेस नर्मदातीरीं रहावें ! बारभाई सरळ चालले तरी रणगची मर्जीची जागा आहे तेथे राहूं. आह्मां जवळ त्यांचे फौजेचं काय प्रयोजन ? तथापि पांचचारशें आमचे ममतेचे लोक राहिले तरी काय चिंता आहे ? तुफानें घ्यावयायोग्य, मात्र नसावें! आमचा खर्च निदान, दवलत सोडिली तरी, लक्ष रुपये दरमहा पाहिजेत, इतकें कांहीं त्यांस बहुत नाही. आम्हीं, मूल गंगाबाईचा खराच असल्यास, निमे दवलतेचे खावंद. तेथे बारा लक्ष बहुत नाहींत. तथापि ते लोभाविष्ट यास्तव, पांच देतात तितकेच घेऊन नर्मदातीरीं राहूं. आम्हांजवळ चौकी दाखल लोक नलगेत, चाकरीचे रीतीनें हजार पांचशें राहिले तरी राहोत. आपा राहिल्यास उत्तम आहे. परंतु येथील हुकुमाप्रों चालावें. असो. आह्मी ल्याहावें त्यांत व बारभाईचे बोलण्यांत अस्मान जमिनीची तफावत ! दहावीस मराठे व कारभारी मध्यें येतील, आपली खातरजमा करितील, ह्मणोन लिहिलें. तरी ते दरमजल देशाकडे जातात. आह्मी सुरतेंत आहों. दिवसेंदिवस लांबण पडते. तेव्हां त्यांची आस्था किती आहे, हें कळतच आहे ! मन्हाटेही रा। मल्हारजी होळकराप्रों। कोणी नाहींत. तथापि आहेत त्यांत चाकर मातबर मिळोन खातरजमा करितील, तरी पुढे सख्याचा मजकूर पडेल, तूर्त आह्मीं अंगरेजांचे पेट्यांत सुखरूप आहों! थोडेंबहुत खर्चास देतीलच. येथें कांहीं उपद्रव आह्मांस नाहीं. तिळमात्र बंदी नाहीं. मोकळे आहों, व सुखरूप आहों ! बरसात येथेंच होईल. पुढें जें नेमिलें तें होईल. सारांश, येथील सुखापेक्षां तेथें अधिक सुख वाटेल तरी येऊं. दाटून सुख टाकून दुःखांत कोण पडतो ? छ १० रा।खर,