पत्रांक २६४
( मसूदा अहिल्याबाईचा )
श्री
१७०२ मार्गशीर्ष वद्य ३
तुकोजी होळकर इंदुराहून निघाले आहेत. त्यांस पत्रें पाठवावीं कीं, बाईची अमर्यादा न करितां, तुह्मीं लिहून सरकार कामावर न्यावें, ह्मणोन पेशजीं आपण राजश्री विठ्ठल शामराज यांस सांगोन लेहविलें. मारनिलेही लिा। त्याजवरून इंग्रजाचे मसलतीस फौज सुद्धां लौकर नमुद व्हावें, ह्मणोन तिकडे पत्रे पाठविली. त्याप्रमाणें ते कूच करून दरमजल सेंधव्यानजीक आल्याचे वर्तमान आले. त्याजवरून जलद खानदेशांत येऊन, केसो कृष्णाचें पारपत्य करून, लांब लांब मजला करून, वसईकडे इंग्रजांनी दाटी करून लढाई सुरू केली आहे, तिकडील उपराळ्यास सरकारच्या फौजा गेल्या आहेत. तुह्मींही जलदीनें जाऊन पोहोंचून सरकार काम करावें. या अन्वयें त्याजकडे पत्रें गेली आहेत. त्याप्रमाणें ते ( जातील. ) तिकडून लिहिल्यावरून त्यास लौकर मतलतीस येण्याविसीं पत्रें पाठविल्यावरून, सरकारमसलतीचे समई तेही आले. परंतु आपली त्याची भेट जाहली नाही. यास्तव दुसरा अर्थ मनांत आणाल तर आणूं नये. पहिले मामलेदार असतील किंवा नवे त्यांणी केले असतील, त्यांची घालमेल करूं नये. मामलेदारांस ताकीद करून वरचेवरी त्याजकडे खर्चाची पुरवणी होय ती गोष्ट करावी. त्यांजकडील पत्रें आलीं. त्यांत व राजश्री बळवंतराव वांकडे व रखमाजी दादाजी आले. त्यांचे सांगण्यांत मातुश्रीबाईची अमर्यादा कर्तव्य नाहीं. सरकार चाकरी करावयाची. आज्ञा होईल तिकडे करावयास गुंता नाहीं, हे अर्थ आहेत, लिहिल्या अन्वयें त्यांचे फौजेची व खर्चाची तरतूद मामलेदारांस ताकीद करून करीत जावी. नवेजुनेची घालमेल करूं नये. विरुद्ध सहसा दाखऊं नये. येथील लिहिलेवरून तुकोजी होळकर निघाले नाहींत. निघाल्यावर तुह्मीं.........इकडून लिहिविल्यावरून त्यांस मसलतीवर येण्याविशीं पत्रें पाठविलीं. ते येतात...... आहे. प्रसंगावर सर्वांचे लक्ष असावें. येथें तुम्हांविशी दुसरा विचार नाहीं. व ते येथें आल्यावर तुमची मर्यादा करीत असाच अर्थ होईल. ते हिकडे आल्यावर, त्यांणीं कमाविसदार ठेविले होते ते तुम्ही दूर केले, दुसरे पाठविणार, असें करू नये. माणूस.........ते सरकार चाकरीस येतात. महालांची जप्ती होते, तेव्हां चाकरीची उमेद कशी राहील? हें ध्यानांत आणावें. पाटिलवावांचें मत, वांकडें दाखवूं नये, असेंच आहे. याजकरितां लिहिलें आहे. कोणतेंही नवेंजुनें करूं नये. तुकोजीबोवा मसलतीस आले. त्यांस विरुद्ध न वाटे असेंच करावें.
( खासदस्तुर ):–प्रस्तुत इंग्रेजांची मसलत सरवादांत कशी पडली आहे आपली दूरदेशीं समज फार आहे. तेव्हा आपण दुसरी गोष्ट करणार नाही, हे खातरजमा आहे. रा छ १७ जिल्हेज.