पत्रांक १९३.
श्री.
१७८० आश्विन शुद्ध १.
राजश्री लक्ष्मणपंत स्वामीचे सेवेसीं:-
विनंती उपरी छत्रपुरीं मुंबईहून दोघे गृहस्थ आले. त्यांणीं येथें पत्र पाठविले कीं, तेथून पांच लक्षांची वरात फौजेच्या खर्चाची दिल्ही आहे. तरी एक कारकून छत्रपुरास पाठवून देणें. तो वरात पाहील, मग तुह्मांस रु। देणें असले तरी देणें. नाहींतरी फिरंगीयास सांगू. त्यांस यांनीं उत्तर लिहिलें, वरात व पत्रें कैसी आहेत तीं घेऊन येणें. ह्मणोन कासीद गेला आहे. उत्तर आलें नाहीं. नागपुरी भोंसल्यास सूत्र आहे. त्याचा वकील इंग्रजांजवळ आहे. तूर्त चार महिने छावणी करून हा मुलुख काबिल करितात, ह्मणोन लिहिलें ते कळलें. ऐसीयासी, तिकडे सरदार शिवाजी विठ्ठल वगैरे सरकारचे व शिंदे होळकर यांचे आहेत. आणि शिंदे होळकरहि लौकरीच त्या प्रांतें येणार, असें आहे. ईश्वरइच्छेनें शत्रूचें पारपत्य होईल. श्रीमंतांचा प्रताप थोर' आहे. रा २९ साबान. हे विनंती.