पत्रांक १६८
श्री ( नकल )
१६९७ पौष्य वद्य ५
राजश्री यशवंतराव शिंदे गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नों माधवराव नारायण प्रधान आशिर्वाद उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये कुशल लिहीत जाणें. विशेष. तामनोळी व चिकोडी वगैरे गांव श्रीमंत महाराज यांजकडून कर्जांत राजश्री आपाजी शामराव यांचे विद्यमानें राजश्री रामचंद्र महादेव याजकडे आहेत. त्यास, महाराजांची स्वारी बाहेर फौजेसह निघोन चिकोडी प्रांतीं येऊन, गांव खेडीं घेऊन पुढें आणखी घेणार, ह्मणोन कळलें. त्याजवरून, हें पत्र तुह्मांस लिहिलें आहे. तरी, करार जाला असतां, त्यांत अंतर करणें, गांवखेडीं घेणें ही गोष्ट उत्तम नसे. याउपरी महाराजांस विनंति करून गांवखेडीं घेतलीं असतील तीं माघारी देववून, पुढें उपसर्ग होऊं न देणें, नाहीं तरी तैसेंच लिहिणे. त्याप्रों केलें जाईल. या छ १९ जिलकाद, सु। सीत सबैन मया व अल्लफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.