पत्रांक १६१.
श्री.
१६९७ वैशाख शुद्ध ६
राजश्री सखारामपंत बापू गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मअलंकृत राजमान्य स्नो फत्तेसिंग गायकवाड दंडवत विनंती ती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल सदैव पत्रीं लेखन करून संतोषवीत असावें. विशेष. आपणाकडून पत्रें आह्मांस व साहित्याविसीं पत्रें अमदाबादकर ग्रहस्त व पित्रव्यास येत गेली तीं त्यांजकडे पावती करीत गेलों. साहित्याचा प्रकार आजपर्यंत प्रथम दिवस! त्यापैकीं आह्मीं कारकिर्दी ममतेनें पित्रव्याचे मुख्य पुत्र चिरंजीव राजश्री मल्हारराव गायकवाड आह्मांकडे आणिलें. तेव्हां अधिक शुद्ध द्वितीया-तृतीयांचीं युद्धें दोन जाहली. याज अलिकडे युद्धप्रसंग आजपर्यंत जाला नाहीं. आह्मीं बडोदें, खेड, पाटण प्रांतांची ठाणीं कायम करून, आपले लेख धैर्याविशीं येतात, त्याजवर दिवस काढितों. पुढें दिवस निघावयाचें संकट. हें पूर्वीं व हालींचे वर्तमान राजश्री दादासाहेबाकडील वगैरे, सविस्तर राजश्री बाळाजी नाईक भिडे यांचे पत्र लिहिलें आहे, त्याजवरोन कळों येईल. सारांश, मुरबीपणाचा सर्वस्वीं भरंवसा आपला आहे. त्याजवर असूं. विशेष ल्याहावेसें नाहीं. आपणाकडील साकल्यार्थ लिहून संतोषवृत्ती करावी. रा छ ४ माहे सवाल. बहुत काय लिहिणे? लोभ असों दिजे. हे विनंती-मोर्तबसूद.
