पत्रांक १५९
श्री,
१६९६ फाल्गुन वद्य १०
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री जनार्दनपंत दादा स्वामीचे सेवेसीः-
पोष्य हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता छ २३ मोहरम मुा खेड जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष, नारोपंत नानास कैलासवास जालियाचें वर्तमान ऐकून श्रम जाहले, ते ईश्वर जाणे. एकाएकींच गोष्ट अशी घडली ! ईश्वरीसत्तेस इलाज नाहीं ! आम्हांस तर वडील होते. व राज्यांत माणूस एक ! अशा व्यक्ती दृष्टीस पडावयाच्या नाहींत. ईश्वरीसत्तेस इलाज नाहीं. हीच गोष्ट खरी. त्यांचे मागें आपण आहेत. लहान मोठ्यांचा परामर्ष करावा. खेद करू नयें. होणार गोष्ट ती चुकत नाहीं. आह्मी नानाप्रों आपल्यास मानितों. त्यांचा लोभ आमचे ठाईं कसा होता, तो तुम्हांस ठाऊक आहे. तदन्वयें करून आपण लोभ करून समाचार घेत जावा. इकडील वर्तमान तर श्रीमंत इंग्रजांकडील सरंजाम घेऊन खंबाइतास आले आहेत. उभयतां गायकवाड आह्मांस येऊन भेटणार. तोहि प्रकार अद्यापि घडला नाहीं ! दोन चार रोजांत कोणता अर्थ तो निवडेल. लिहून पाठऊं. तिकडील वृत्त लिहित जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.
राजश्री सदाशीवपंतदादा स्वामीस सा नमस्कार विनंती. उपरी. फार दिवस पत्र येत नाहीं. ही गोष्ट तुह्मांपासून दूर असावी. नानाचें वर्तमान ऐकिल्यापासून चैन पडत नाहीं. श्रीसत्तेस इलाज काय ? सदैव पत्रीं समाचार येत जावा. लोभ कीजे हे विनंती.
राजश्री तात्यांस सां नमस्कार -विनंती. उपरी; लिा परिसन लोभ कीजे हे विनंती.