पत्रांक १३९
पौ अधिक वा ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री बाबूरावजी दादा स्वामींचे शेवेसीं:-
पौष्य भवानी शिवराम कृतानेक सां नमस्कार विंनती उपरी येथील कुशल अधिक शुद्धत्रयोदशी रविवार मुा नजीक सिंखेड जाणून स्वकीय कुशल लिहित असावें. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय यजमानसाहेबांच्या पत्रासह कळला. श्रीमंत मातुश्री गंगाबाई यांसीं सप्तमी इंदुवासरीं पुत्ररत्न जाहलें, ह्मणोन लिा. त्यास विद्यानगरी एक वेळ सुवर्णवृष्टी जाहली ! अह्मांवर वारंवार देव करितो हाच उल्हास आहे !! परवां गुरुवारीं राजश्री तात्यांस सदरहु वर्तमानाचें पत्र आलें. त्याजवरून श्रीमंत राजश्री नांनासाहेबीं व नबाबांनीं व तात्यांनी पृथक पृथक् नौबतखाने सुरू केले. तोफ, यंत्रें, सरबत्त्या केल्या. अंबारिया व नौबता गजस्कंधीं टाकून शर्करा घांटिल्या. नृत्यादि समारंभ, गजर उछाह जाहाले. संतोष अपरंपार जाहला ! त्याचा तपशील काय लिहावा ? कुलदीपक देवानें लाविला! आमचे साहेबांस आनंद अन्योन्य जाहला ! देव त्यांस आयुष्य यथेष्ट करील ! सर्वांचे जीवन आहे. आह्यांस आधार बळकट जाहाला. आपण सर्व जाणतात. राजश्री नाना अद्याप आले नाहींत. उदयिक येणार, त्यांचे भेटीनंतर कळेल. येथूनही सविस्तर लेहूं. दरमजल नेमिल्या कामांस जात असों. कळावें. श्रीमंत राजश्री बापू व नाना यांसीं पत्रे लिहित होतों. परंतु राजश्री नानाजोशी येणार, त्यांची भेट होऊन त्या हातीं या अर्थी न लिहिलीं. आमचा साष्टांग नमस्कार सांगावा. सर्व प्रकारें या स्थळीं स्थापित आहों. आपण आमचा समाचार वारंवार घेत जावा, पदरचे असों. बहुत काय लिहिणें ? हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)