पत्रांक १३८.
पौ अधिक वा ४ शुक्रवार
श्री.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १३
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुद्ध १३ रविवासर मुा नजीक सिंखेड वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें खंडूबरोबर नवमीचीं पाठविलीं तीं काल मंदवारीं पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. श्रीमंत राजश्री सेनासाहेब सुभा यांस व भवानी शिवराम यांस पत्रें पाठविलीं तीं त्यांस दिल्हीं, उत्तरें पाठविलीं आहेत. पावतील. श्रीमंत मातुश्री गंगाबाई यांस पुत्ररत्न जाहालें, ह्मणोन लिहिलें. त्यास, तुमच्या पत्रापूर्वीं तीन दिवस तोफखाने यांचा सांडणीस्वार पत्रें घेऊन आला. त्यावरून संतोषाचें वर्तमान आईकोन, निजामुद्दौले व सेनासाहेबसुभा व हरीपंत तात्या व सर्व सरदार आबालवृद्ध यांस संतोष जाहाला! तो पत्रीं लिहितां येत नाहीं ! सरबत्ती व नौबतखाना सुरू करून शर्करा पृथक् पृथक् वांटल्या! ईश्वरें अमृतवृष्टी करून वंशावळी प्रस्पुलित केली ! तशांत, भगवंतास प्रजेचें पालण आणि धर्मसंस्थापना कर्तव्य आहेच आहे हा निःसंदेह जाहाला ! पुढें सर्वांचे मनोरथ सिद्धीस जातील, हे उमेद कुलवाद जाहाली! इकडील वर्तमान तरीः शहरपर्यंत मजलदरमजल नबाबसुद्धां आले. नबाबाचा मुकाम शहरासमीप जाहाला. वरकड फौजा चिखलठाणावर राहिल्या. दुसरे दिवशीं मुकाम नबाबामुळें सर्वांचे जाहाले, तिसरे दिवशीं राजश्री तात्यांनीं कूच करून फुलबारीवर गेले. सेनासाहेबसुभा यांचा मुकाम गवगव्यामुळें जाहाला. नबाबांनी शहरीं सावकारांपासून पट्टी करून घ्यावयाकरितां मुकाम केले. तात्यांनी फुलबारीवर मुकाम केला. सेनासाहेबसुभा कूच करून तात्यापाशीं आले.
नबाबही तिसरे दिवशीं आले. काल कुच सर्व फौजेचें तेथून जाहालें. आजही कूच जाहालें. मजलदरमजल योजिल्या कार्यास जात आहेत. परंतु श्रीमंत फार लांबले. गांठ कधीं पडत्ये तें पहावें. राजश्री आपाजीराव पाटणकर व वणगोजी नाईक व राजश्री नाईक निंबाळकर मध्यस्तीस श्रीमंतांकडून आले. तों उत्छाहाचें वर्तमान आलें. तेव्हां त्यांचें बोलणें निमे जाहालें, बहुधा वरपंग मध्यस्तीचा प्रकार, ऐसेंच दिसतें. समागमेंच आहेत. वरकड वर्तमान अधिकोत्तर ल्याहावें ऐसें नाहीं. बारशें जाहाल्यावर पेशवाईचीं वस्त्रें होतील. उपरांत फौजेंत यावयाचा मजकूर श्रीमंत राजश्री बापू व नाना यांचा होईल. उभयतां आल्यास आपलें येणें होईल. उभयतांचें येणें न झाल्यास एकटे बापूच आले तरी त्यांसीं येथील बंदोबस्त करून बोलोन घ्यावें. कामकाज होणें यथास्थित ममता करून दिल्यास पुढें नीट पडेल. याजकरितां सूचना लिहिली आहे. राजश्री हरीपंत तात्या कृपाच करितात. प्रस्तुत यांचे फौजेंत रोजमरेयाचा गवगवा आहे. सवालक्ष देतात. परंतु यांचें कांहीं होत नाहीं. ऐसें आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ किजे. राजश्री नानाचें पत्र नगरचें आलें. सत्वरच येतील. हे आशिर्वाद. सरकारची पत्रें सेनासाहेबसुभा यांस नाहींत. हें काय तें ल्याहावें. हे आशिर्वाद.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)