पत्रांक १३६
पो. अधिक शुद्ध १४.
श्रीशंकर
१९९६ अधिक वैशाख शुद्ध १०
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री सखारामपंत बापू स्वामीचे शेवेसी:-
पो आपाजीराम कृतानेक सां नमस्कार विनती येथील कुशल ता अधिक
शुा १० गुरुवासर मुा का जामखेड पा आंबेड येथें सुखरूप जाणून स्वानंद कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष आपणाकडून पत्र आलें तें को मारीं काल दोन प्रहरां प्रविष्ट झालें. पेशजीं पत्रीं आम्हीं राजराजकी वर्तमान लिहिलें. येथील खर्चवेंचाचा मजकूर लिहिला होता. त्याचा तपशीलवार जाब न पाठविला. इकडिल वर्तमान तरः श्रीमंत राजश्री दादासाहेब टोक्यास आले होते ते पेशजीं लिहिलें होतें. तेथून मज़लदरमजल पिंपरी परगणा एकतुणी पासून तीन कोसांवर आले दोन मुकाम जाले. आह्मीं शुा प्रतिपदेस ठाणें सोडून जामखेड येथें आलों. पाटील, कुळकर्णी, रयत साडेतीन गांवचे येथे आले. कांहीं आपलाले सोईनें गेले. गांव दरोबस्त कसब्यासुद्धा पायमल्लींत आले, लोक घाबरेपणें सडेमात्र पळोन आले, घरेदारें अगदीं तसनसींत आलीं. श्रीमंतांचे सैन्याचा दंगा चार दिवस जाला. आसपासचे गांव कित्येक जाळले. माणसें मारली, तो दंगा कोठपर्यंत ल्याहावा ? त्याजउपर मोंगलाई फौज व भोंसले व स्वसैन्य हा आकांत ! त्याचे मजलीनें आली. त्यांचा दंगा अद्याप आहेच. तात्पर्य, गांव अगदीं पायमल्लींत आले. पेस्तर सालची तरतूद होऊन लावणी होणें संकट आहे. वाकळूजची गुरेढोरें व बैल देखील गेले. कसब्याचीही बैलढोरे गेली; व हे गांवची तसनस बहुत जाहली. घरे, गांव अगदीं परागंदा जाले. ईश्वरे मोठें संकटांत घातलें आहे. आह्मी घोड्यांचे चंदीकरितां सात आठ पल्ले हरभरे व पांचसात पल्ले बाजरी व पांच हजार सरम घेतला होता. तो सरंजाम अगदीं गेला. दीडशां रुपयांची नुकसानी जाली. आता पुढे घोड्याचे दाण्यावैरणीची व आमचे खर्चाची तर्तुद होणे कठीण जाले आहे. या दंग्यांत कोणी कर्जवामही देत नाहीं. ऐसा योग प्राप्त जालाआहे. अरिष्टही निवारलें नाहीं. पुढें योगक्षेम कसा करावा? आतां यो सालांत वसूल घ्यावयास जागा नाहीं. पुढें तर्तुदीस जागा नाहीं. याचे काय करावें हे आज्ञा, ल्याहावी. त्याप्रमाणें वर्तणूक करू, ठाणें टाकून घोडीं पिढीं घेऊन या ह्मणाल तर घेऊन येतों. अथवा कसें करावें हें विस्तारपूर्वक ल्याहावे. आह्मी तर मोठे संकटांत आहोंत, जीव रक्षावयाचें कठीण पडलें आहे. भगवत् इच्छेस उपाय नाहीं, तुह्मांकडील पत्र येतें तेथें मजकूर उगडून लिहीत नाहीं. त्यास, तपशीलवार उगडून ल्याहावें कीं, तुमचे आज्ञेप्रमाणें वर्तणूक करावयास येईल. तुह्मीं मोघमं लिहिल्यास, आह्मीं काय समजावें? साल मारीं परगण्यांत वसूल नाहीं. परंतु सालापेक्षां महाल मा अधिक पडला. व पुढेंही पाहिजे. होण्याचा ऐवजहि खर्चाचे भरण्यास गेला. चार तट्टें जगलीं पाहिजेत व चार माणसे संग्रहीं पाहिजेत. ऐसा योग घडला आहे. श्रीनें काय योजना केली असेल ते नकळे. पत्रीं कोठवर रड ल्याहावा ? राजक्रांत बहुत कठीण आहे. आतां पाटील व लोक ममतेंत घेऊन गांवावर वस्तीस न्यावी तर अरिष्ट निवारलें नाहीं. कोण्हे समयीं परतून येईल हें तथ्य नाहीं. मोंगल अद्यापी शहरींच आहे. चोर, राउत नित्य लूट लबाडी करितात. रा हरिपंत फडके यांचे निसबतीचे सैन्य व साबाजी भोसले यांचे सैन्य चौक्याची घांटी उतरून फुलमरी परगण्यांत गेले आहेत. मोंगल व दर्याबाई भोसली ही दोन पथकें शहरावर' आहेत. श्रीमंत फर्दापूरघाटें उतरून खानदेशांत गेले, ऐसें आहे. पुढें काय होईल हें नकळे, घोडीं पिढीं जगून तुह्मांजवळ येणेंचें संकट पडलें आहे. येथें आहेत यांचाही भरंवसा येत नाहीं. ऐसें जालें आहे. पुढें काय करावें ? वर्तमान कोण्हास ल्याहावें ? हें ठिकाण राहिलें नाहीं. जिवावर गोष्ट आली आहे. भगवंत पार पाडून तुमची भेट घडवील तेव्हां खरें. अस्तु. आपला उपाय नाहीं. घोडी घेऊन तुह्मांकडे यावें, ऐसें आहे. येथें राहिल्यास खर्च चालला पाहिजे. याची आज्ञा काय ते लिहिणें. त्याप्रों वर्तणूक करावयास येईल. ठाणें मोकळें सोडून यावें की बंदोबस्त करून यावें, हें लिहिणें. पुढें गांवचा बंदोबस्त व पेस्तर सालची तर्तूद कोणते अर्थी कसी करावी, हें उगडून ल्याहावें. या पत्राचें उत्तर ये तोपर्यंत ठाण्यांत अथवा आसपास आहोंत. उत्तर आल्यावर मग जे आज्ञा होईल त्याप्रों करू. या प्रांतीं कांहीं बाकी राहिली नाहीं. अगोदर पर्जन्याची आफती, त्याजवर फौजांचें उपसर्ग जाले. याजमुळें अगदीं काम बुडालें. ईश्वर इच्छेस उपाय नाहीं. विस्तारे ल्याहावयास कांहीं सुचत नाहीं, बहत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.
सेवेसी निलकंठ पिलदेव सां नमस्कार. लिा धारें निवेदनांत येईल. ईश्वरें मोठे घोरांत घातलें आहे. निर्वाह होणें संकट आहे. असो. उपाय नाहीं. आपणाकडील सविस्तर ल्याहावें. लोभ करावा. हे विनंती.