पत्रांक १३२
श्री.
पौ अधिक शुद्ध.
१६९६ अधिक वैशाख शुद्ध १
श्रियासह चिरंजीव राजमान्य राजश्री बाबूरावजी वैद्य यांसीः-
प्रति लक्ष्मण बल्लाळ आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता अधिक शुद्ध १ मुा लष्कर नजीक किल्ले नगर वर्तमान यथास्थित असे. विशेष. हरिभक्तपरायण राजश्री मार्तंडबाबा वास्तव्य जेजुरी हे राजश्री सेनासाहेब सुभा यांचे गुरु आहेत. त्यास प्रस्तुत गडबड आहे. यांचे मुलांमनुष्यांचे संरक्षण जाहालें पाहिजे. याकरितां राजश्री नानासाहेब यांनीं राजश्री नाना फडणीस यांस व तुह्मांस पत्र लिहिलें आहे कीं, किल्ले पुरंधर येथें घराची सोय करून देऊन सांभाळ करावा. त्यास, हे आपणाकडे येतील, तरी, यांची भेट करून देऊन, यांस स्थळ देऊन, संरक्षण होय तें करावें. व करडेरांजणगांव येथील फडणीसी यांचे जामातास करून द्यावी. येविशीं यजमानांनी लिहिलें आहे. त्यास, आपण साहित्य करून, सनद फडणीशीची करून देवावी. हे थोर तपस्वी आहेत. जेजूलिंगही यांस प्रत्यक्ष आहे. यांनी राजश्री नाना फडणीस यांच्या कल्याणाविशीं व संतानाविशीं सांगितले आहे. त्यास, तुमची भेट जाहल्यास पुसावें म्हणजे सांगतील, त्याप्रों त्यांच्या कानांवर घालून, त्यांसी यांसी गांठ घालावी. ह्मणजे यथास्थित होईल. हे निस्प्रह आहेत. कांहीं आशा धरून सांगतात, ऐसें नाहीं. आणि जें सांगतील त्याप्रो घडेल, यांत अंतर नाहीं. आह्मांवरही कृपा करितात. आपली भेट जाहालियावर आपल्याहि प्रत्ययास येईल बहुत काय लिहिणें ? लोभ किजे, हे आसिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस सा नमस्कार, विनंती. लिा प्रों अगत्य साहित्य करावे, हे विनंती.