पत्रांक १२०
श्रीशंकर. ( नकल )
१६९६ चैत्र वद्य ६
वडिलांचे सेवेसीं. साष्टांग नमस्कार विनंती येथील क्षेम ता चैत्र वा ६ मंदवासर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्रें दोन जासुदाबरोबर पाठविली तीं पावलीं. वर्तमान कळलें. पाटणकर वगैरे यांचे विद्यमानें सूत्रें लागलीं आहेत व तेथून सरकारचा कोणी कारकूनही गेला आहे म्हणोन येथें बातमी आली आहे, त्यास शोधांत आसोन जे गोष्टीनें मुस्तकीम राहे तें करावें, म्हणून लिहिलें. त्यास, सूत्रें बहुत येतात. येथून कारकून कोणी गेला नाहीं. सूत्रें येतात. परंतु येथें ती अलक्ष आहेत. चिंता न करावी. उतावळीनें मामांनीं यश त्यास दिल्हें. उपाय नाहीं. ते दिवशीं सबूरी केली असती तर रात्रौ हे मिळाले असते. हे वीस कोसांची मजल सडे स्वारीनशीं नाझरेयानजीक माणेवर तृतीय प्रहरीं आले. जीन हालविले. रात्रौ जीन ठेऊन मामाजवळ जावें, हा इत्यर्थ केला. तों सूर्यास्तीं पळ मामाकडील आला. तेव्हां जीन ठेऊन तयारी करून उभे राहिले, पळ आला, त्यास खातरजमा करून पाठीशीं उतरविलें. प्रातःकाळीं राजश्री हरीपंत तात्या व सर्व सरदार आले. तेथेच मुकाम केला. नबाबही लांब मजल करून तेथेंच आले. सर्व एकत्र होऊन पुढें चाल धरिली. नबाब निजामअल्ली याचा पुतण्या येत होता, त्याजवर श्रीमंत धांवले. त्यास धरून नेलें, हेंहि वाईटच जाहालें. परंतु मिजाज कायम आहे. काल कूच करून येथें आले. आज कूच करून पुढें जात आहेत. श्रीमंतांचा मुकाम काल नलीमचा होता. विसां कोसांची तफावत आहे. लवकरच गांठ पडते. ईश्वरसत्तेनें परिणामही उत्तमच होईल. सर्व सरदारांची मिजाज हा कालपावेतों कायम आहे. पुढें ईश्वर बरेंच करील. चिंता न करावी. बहुत काय लिहिणें ? तीर्थस्वरूप भाऊकडून सांडणीस्वार दोन वेळ आला. वर्तमान लिहिणें म्हणून आज्ञा होती. त्यावरून दोन वेळ पत्रें लिहून संकलित वर्तमान लिहून पाठविलें आहे. कळावे. हे विनंती.
वडिलांचे सेवेसीं आपत्यें गणेश नारायण सां नमस्कार, विज्ञापना, आनेशिवाय किमपि गैरवर्तणूक व्हावयाची नाहीं. हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)