पत्रांक ११९
श्री
पौ चैत्र वद्य ११ गुरुवार
१६९६ चैत्र वद्य ६
आशिर्वाद. उपरी. राजश्री भवानराव प्रतिनिधी चतुर्थीचे दिवशी रात्रौ श्रीमंताच्या लष्करांतून निघोन इकडे यावयाचे उद्देशें आले. त्यांचेमागें, राजश्री सखाराम हरी धांवले होते. परंतु त्यांची यांची गांठ पडली नाहीं. सखाराम हरी माघारे गेले. प्रतिनिधी अद्यापि या लष्करांत पोहोंचले नाहीं. त्यांचा ब्राह्मण व खिजमतगार काल रात्री लष्करांत आले. तेही आज येतील. राजश्री मामा तिकडे गेल्यावर तात्या वगैरे सर्व सरदार नाझरेयाचे मुकामीं एकत्र जाहले. उपरांतीक पत्रें तात्यांची व येथील देऊन प्रातःकाळीं सांडणीस्वार आपणाकडे रवाना केला. त्याचें उत्तर अद्यापि आलें नाहीं. सांडणीस्वार पोंहचला न पोंहचला हें कळत नाहीं. मामांचे वर्तमान तेथें कळल्यानंतर पुढें मसलत काय जाहली, हें सविस्तर ल्याहावी. येथील प्रकार तरीः मामा गेले ह्मणून कोणी आंव टाकिला नाहीं. मुस्तकीम आहे. चिंता न करावी. या उपरी गांठ पडेल ते दिवशीं काम कैसे होतें हें प्रत्ययास येईल. भगवंतास ऐसें करणें होतें. याजकरितां ते दिवशीं सेना-साहेबसुभा समयास नव्हते. जर करतां असते तरी मामांस उतावळी करूं न देते. इतकेंही असोन गांठ पडती, तर निघाले नसते. ईश्वरसत्तेने होणें तें होतें. ते दिवशीं वीस कोसांची मजल करून नाझरेयावर आले. रात्रौ मामांस मेळवावें. ते सूर्यास्तीं मामाचा पळ येऊं लागला. तेव्हां तयार होऊन उभे राहिले आणि मामाकडील पळ आला त्यास धीर भरंवसा देऊन पाठीसी उतरविलें ते दिवशीं ही फौज तेथें नसती तर मामाकडील पळाचा बहुत नाश होता. ईश्वरें कृपा केली. दुसरे दिवशीं मामाकडील फौज जमली. अविंधही आला त्या दिवसापासून सर्व संनिधच राहतात. एका दों रोजां गांठ पडेल, ऐसें दिसतें. मार्गानें जासूद निभावत नाहीत. याजकरितां पत्रें लिहिणें ती नांवें करून न ल्याहावी. 'विनंती उपरी' म्हणून ल्याहावीं. लखोटयावर मात्र नांव ल्याहावें ह्मणजे ठीक पडेल. बहुत काय लिहिणे ? लोभ किजे. हे आशिर्वाद.
राजश्री नाना स्वामीस सां। नमस्कार विनंती. सविस्तर अर्थ लिहिलाच आहे. त्यावरून कळेल. तिकडील अर्थ इत्तंभूत लिहिला पाहिजे. येथील चिंता न करावी. मुस्तकीम आहे. हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)