पत्रांक ११०
श्री
पौ छ ११ मोहरम
१६९६ चैत्र शुद्ध ९,
आपत्यें तात्यांनीं दोन्ही कर जोडून चरणावर मस्तक ठेवून सां नमस्कार विनंती येथील क्षेम तो चैत्र शुद्ध नवमी रविवार मुा नजीक मासवड वडिलांचे आसिर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. शुद्ध प्रतिपदेचीं पत्रें आलीं तीं काल मंदवारीं पावलीं. अक्षरशा अवलोकनीं साकल्य लेखनाभिप्राय कळों आला. मातुश्रीच्या पत्राची नकल पाठविली. उत्तम आहे. अस्सल ठेऊन घेतले. पूर्वी यादी व पुरवणीपत्रें दस्ताऐवजीं आहेत, ती जतन असावी, या पत्रांत उभयतांचे लेख आहेत, यास्तव ठेविली. त्यास, त्यांची भाषणें पक्केपणाचीं दस्तऐवजीं. तेव्हां पत्राचे अगाध नाहीं. यजमानाची अस्ता शब्दगौरवी हस्ताक्षर अलंकृतांतच. ऐसीयास, तें पत्र पाठविल्यास फारच संतोष आहे. वारंवार पुसतात. नकल दाखविल्यानें एक प्रकार भासतें. ऐसें आहे. वरकड कित्तेक प्रकार सुचविले. ते यथार्थच, प्रसंगोपात आज्ञेप्रमाणे घड़वीत असों. पोतदारांची सरंजामाची बंदोबस्त येईल. हत्ती-विषयीं आज्ञा. त्यासी, येथें मोठे खासे तीन आहेत. वरकड तैसेच आणीक आणविले आहेत. आल्यानंतर चांगला पाहोन घेतों, पदें येथे नाहींत. दारव्यास आहेत. रहवळ तुर्कीविषयीं लिा। त्यासीं एकदोन रोजी मागाहून पाठवितात. एकच पाठविल्यानें विपर्यास दिसेल. यास्तव दोन पाठविणार. याशिवाय आपला सत्वरच पोहोंचेल. त्याच्या खर्चाचा प्रकार वारंवार लिहित गेलों. त्याचा भार आभार सर्व रा हरीपंत तात्याकडेच घालून लिा, त्याजकडील साधन रक्षावें, रा मामाकडील तिडन पडों देणार नाहीं. त्यास यजमानाचें त्यांचें पूर्ण संधान होतेंच. हालीं पत्रपत्रीं वळख पुर्ती पुरली. कित्येक ममतेचीं भाषणें परस्परें जाहली. तीं आमचें विद्यमानेच घडलीं. मामासही त्यांणीं याजविसीं तेथील लक्ष उमजाविलें, तात्याचें पूर्वी सत्तरपर्यंत ऐवज यांस दिला होता. हे आल्यानंतर पाऊण दिल्हा. यांस तो दरमहा साडेतीन पर्यंत लागतात. रोज धरणीं, कटकटी, रुसवे मारनिल्हेनींही येऊन पाहिलें. आणिकही कांहीं कर्जदाखल तजवीज करून महिन्याची समजूती करावी, ऐसें होतें. तों त्यांस मामांनीं दोन हजार फौज समागमें देऊन साता-यासीं रवाना केलें. त्याच दिवशीं मामा, व दकार नामक, घवसे यांच्या गोटास जाऊन त्यास भाषण केलें जें, लक्ष ते आह्मांकडे असावे, नबाबाच्या आमच्या विचारें होईल तें करावें. त्याणें उत्तर केले की, सारी नजर मसलतीवर, त्यांत दर्याबाईची फौज आपली करून ठेविली, तें उपयोगास येणार नाहीं. त्याची सल्ला काय ? याणीं उत्तर केलें उभयतांचें समाधान करून द्यावें, वडीलपण तिचें रक्षावें, मुलाचें लेंकुरपण चालवावें, दोन्ही फौजा एकदम कामावर सादर असाव्या. याप्रा घाट घालून डे-यास आले. दुसरे दिवशी धंवसे सेनासाहेब सुभे यांच्या डे-यांत कूच समयीं आलीं. दकार नामक तिराईत ऐसे आले. भाषणांत त्याप्रा आणिलें. याणीं मान्य केलें, मामाच्या व नबाबाच्या विचारास आलें तें आह्मांस मान्यच आहे. जातीनीं शपथ वाहिली, मी दुस-याची सेवा करणार नाहीं. सारांश, हें सौष्ठाई आपसांत करून योशीतेस सांगावें. याणीं हातीं धरून जाऊन आणावी. ऐसें बोलोन गेले. परवां शुक्रवारीं कूच जाहलें. तों बाई यवनाचे पिछाडीस फौजसह राहिली. आतां तुळस आपले दरम्यान मामा. त्या गोष्टीची वार्ता नाहीं. वृद्ध व दकार नामक जिवाजी रघुनाथ यांसीं भाषण केले जें, तुह्मी आमचे, ऐसीयासी यवनास सांगावें, एक लक्ष आमशींच असावें, तिकडील लक्षासीं गरज नाहीं, त्यांणी दातृत्व मान्य केले असेल त्याची सवाई दिढी आह्मांस मान्य, भोंसले यांजकडीलही पक्ष न करावा. कृतकार्य सिद्धीस गेलियानंतर जसें विचारास येईल तैसें करूं. जिवाजी पंतांनीं उत्तर केलें कीं, आह्मीं आपलेच, परंतु या जाबसालांत आजच पेंच पडतो. त्याचें प्रत्योत्तर सांगितले, होईल तैसें करीतच आहों. दिवसें दिवस मसलत जवळ येत चालली. मामांचा विचार उमजांत येत नाहीं. यवनाचें लक्ष तेथें परिछिन्न दिसते. मामासी चित्त शुद्धता नाहीं. येविसीं यवनांची पत्रें तेथें, गेलींच आहेत. ध्यानांत येईल. श्रीमंत दादासाहेबांकडून संधान आले होते. सेनाखासकीली तिसा लक्षांची जहागीर द्यावी, आपले लक्ष असावे. पाणी ठिकाण लोगों ने दिल्हें. त्याजवर प्रस्तुत हस्ताक्षरी पुर्जा कोणा ग्रहस्थाजवळ आला. पद, जागा किल्ला देतों. तेंही उपेक्षिलें.. आणिकही सूत्र आहेच, सेवट एकले तुह्माजवळ येऊं, निखालसपणाचें उत्तर यावें, आपलीकडील खातरजमा जशी पाहिजे तैसी देतों, मुधोजीस कैदहि ह्मणाल तर करितों, एक माझे वेचन गुंतलें ह्मणोन असें केलें होतें, पद किल्ले जागा ह्मणाल ते देतों. ऐसे जाबसाल आहेत. यांचा खंबीर कायम इस्तकबील बाहाल आहे. लक्ष मातुश्री आणि उभयतां पाशीच आहे. यवनही तेथील संधानावरून आणि याणीं सिल-सिला ठेविल्यावरून त्यांचेच लक्षीं त्यांचे मसलतीवर दृढतर दिसतो. मामांचे मर्जीस मात्र बेभार, कोणीही प्रकार कुच-मुकाम सल्ली मसलत येक विचारें असावीं. श्रद्धाच तरी आपलेंच करणे जरूर, ऐसें आहे. दर्याबाईची दिवाणगिरी व फडणनिसी आपलीकडे करून घेतली. वार्तक कामकाज करितात. मल्हारपंत वगैरे पांच चार असामी त्यांचे होते. त्याजवर आरोप आणून आपले गोटांत आणून ठेवणें, ऐसेंहि आहे. घडेल तें खरें, जितकें जाहलें वर्तमान ते लिहिलें असे. हल्लीं येथून चिठ्या रा जोत्याजी घाटगे रुा ७॥ हजार व रा चिमणाजी घाटगे रुा पांच हजार एकूण साडेबारा हजार रुपयांच्या चिठ्या केल्या आहेत. कित्ता रा बाळाजी गणेश यांचा * चिठी रुा पांच हजार साडे अठराशाच्या चिठ्या गेल्या आहेत. ऐवज दिक्कत न पडतां द्यावा. वरकड वर्तमान मागाहून लिहून पाठवितों. कळावें. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विज्ञापना.
सेवेसी सदाशिव सोनदेव कृतानेक सां नमस्कार विनंति लिा परिसोन कृपालोभ करावा, भेट होईल तो सुदीन. हे विनंति.