पत्रांक १०७
श्री.
१६९६ चैत्रशुद्ध ५
अपत्यें तात्यानें दोनीकर जोडून सां नमस्कार विज्ञापना ता चैत्र शुद्ध पंचमी मुा नजीक सांगोलें क्षेम असों विशेंष, वडिलीं राणोजी खोपडे व जासूद व कासीद यांजबरोबर तीन पत्रें पाठविलीं ती पावलीं. लिहिलें वर्तमान कळलें. इकडील वर्तमान तरीः सर्व यथास्थित आहे. राजश्री हरीपंततात्याची भेट जाहाली. सविस्तर त्यांस सांगितलें व त्यांनींही दृष्टीनें येथील अडचणीचा प्रकार पाहिलाच आहे. पुढें कांहीं बंदोबस्त करून देतात की नाहीं, तें पाहावें. सविस्तर राजश्री लक्ष्मणपंत यांच्या पत्रावरून कळेल. श्रीमंत दादासाहेब फौजसुद्धां , सत्पऋषीच्या रोखें जात आहेत. आईनापुरावर होते. त्यास हेही आडवे जातच आहेत, एक दों रोजां गांठही पडेल. सातारेयाकडील वर्तमान कळावें याजकरितां जासूद जोडी पाठविली आहे. राजश्री नानासाहेब यांसीं एक पालखी बसावयास पाहिजे. त्यास, दांडी उत्तम, फार चांगली, परिक्षेनें घेऊन, पालखी पडदेसुद्धां तयार, खासेयास बसावयास तयार करून लिहून पाठवावें. येथें आह्मांजवळ भोईयांची पांबडी आहे, ती ठीक नाहीं, याजकरितां एक पांबडी, भाई तेथें आहेत, दोदु नाईक याची, ते पालखी देऊन पाठवावे. येथें पांबडी आहे ही पाठऊन देऊ. राजश्री चिमणाजीपंत लेले यांजपासून पांचशे रुा घेतले आहेत, व राजश्री दिनकरपंत राजवाडकर यांजपासून हजार रुा घेतले आहेत, एकूण दीड हजार रुा घेऊन सरकारांत किरकोळ खर्चास दिले आहेत. व राजश्री सदाशीव सोनदेव यांजपासून हजार रु। घेऊन सरकारचे मुदबक दिले आहेत. एकूण अडीच हजारांच्या चिठ्या केल्या आहेत. चिठ्यांप्रमाणें रु। पावते करून उत्तरें घेऊन पाठवावीं, राजश्री सदोबादादा यांजबद्दल हजार रुा घेऊन जमा करावे. सातारियास गंजीकोट प्रतीचे रुा त्याचे कागद ब जिन्नस पा आहेत, त्याप्रों पोंचते करून जाबसाल पा द्यावा. तुरकी घोडा किंवा घोडी राजश्री नानास पा द्यावी म्हणून आज्ञा. त्यास, तुरकी घोडे, सौदागर आले आहेत, त्यांजपाशीं आहेत. ते घेतले म्हणजे पाठवून देवियों. घोडी गरीव, चालणार, खूप-सूरत पा द्यावी. ऐसी, तूर्त यांजवळ राहिली नाहीं. कोठे घेऊन तेहि पाठवून देवितों. तेथून याजकारणें कांहीं पोशाख एकादा किंवा कांहीं पैसे पाठवुन द्यावें. येणेंकरून ममता विशेषशी वाटेल. तूर्त गणोबास पा नाहीं. त्या फौजेचा मोकाबला समीप राहिला. ऐवज राजश्री मामा देतील तोच घेऊ. आणखी कोठें कर्ज-वाम मिळाल्यास पाहतच आहेत. अडचण मोठी ! उपाय नाहीं ! आणखीही येथून वीस पंचवीसपर्यंत चिट्या करितों. लाख रुा यांस द्यावयाचा करार. त्याशिवाय ऐवज जास्त होईल तो त्यांजकडे. कर्ज सरकारचें जाहालें, यांस कर्ज, कांहीं ऐवज पाहिजे. येविशीं पेशजीं दोन चार पत्रें लिहिलीं असतां उत्तर आलें नाहीं. यांसी लाख रुा अधिक ऐवज देऊच नये. कशी मर्जी आहे तो शोध घ्यावा. बिना कर्ज कांहीं मिळाल्याखेरीज चरितार्थ होतच नाहीं. पुढें कर्जाचे ऐवजास एक दोन महाल लावून देतील. वसूल करून ऐवज घ्यावा. पत्राचें उत्तर सत्वर पा द्यावें. त्याप्रमाणें करूं. नबाब व रुकनुद्दौला यांनीं पत्रें राजश्री बापूंस व राजश्री नानांस लिा आहेत. तेही लाखोटे पाठविले आहेत. त्यांस पावते करावे. तेथून पत्रें उभयतांचीं व श्रीमंत बाईचीं वरचेवर येत जावीं. विशेष वारंवार काय लिहूं ? दृष्टीस येतें तें लिहितों. बहुत काय लिहिणे ? हे विज्ञापना, पाणक्या ब्राह्मण चांगला, पंगतीस जेवी असा ठेऊन पा द्यावा. हे विज्ञापना.
सेवेसी गणेस नारायण सा नमस्कार विनंती.