पत्रांक ९६
श्री.
गौ छ २६ जिल्हेज
१६९५ फाल्गून वद्य ६
आशिर्वाद उपरी येथील क्षेम ता फाल्गुन वद्य ६ भृगुवासर पावेतों मुा नजीक गुंजोटी वर्तमान यथास्थित असे. विशेष. रुकनतद्दोले यांची भेट बुधवारीं रात्रौ राजश्री मामासाहेब व सेनासाहेबसुभा यांची जाहली. भाषण ममता पुरस्कर जाहलें. आज उद्यां निजामअली याची भेट होईल. उपरांत चालीचा प्रकार ठरोन कूच होईल. रा भवानी शिवराम व चिमणाजीपंत दिा राजश्री शिवाजी विठल हे नवाबाच्या लष्करांतच आहेत. देवाजीपंत धौसे यांस आणावयास गेले ते लवकरच येतील. श्रीमंत राजश्री दादासाहेब कोणे ठिकाणीं आले हें तहकीक बातमी नाहीं. त्यांजकडून राजारामपंत व भिकणखान आले आहेत. त्यांनी नबाब निजामअल्ली यास जहागिर वीस लक्षांची व दोन किल्ले देतों, ह्मणोन सूत्र लाविलें आहे. परंतु लक्ष मिळालें नाहीं. मामाच्या बोलण्यांत आलें आहे कीं, त्यास निरोप द्यावा; ठेऊ देतों, म्हणून मदारुलमहाल यांनी करार केला आहे. आजउद्यां निजामअल्ली यांच्या भेटी होतील. उपरांत मसलतीचा विचार ठराऊन इतकियांत बातमीहि पक्केपणाची येईल. मग रोंख कोणीकडे होणें तो देतील ऐसें आहे. भवानीपंतांच्या व रुकनतदौलांच्या बोलण्यांत त्यांणी दर्शविलें कीं, तुह्मांविसी राजश्री बापूस व राजश्री नानांस आह्मी लिहिलें होतें. त्याचीं उत्तरें आलीं तीं दाखविलीं. यांनींहि दर्शविलें कीं, आह्मींहि आपला स्नेहच असावा, ह्मणोन लिहिलें होतें. त्याचींहि उत्तरें आलीं आहेत. त्यास पत्रें पाहों झटल्यास असावीं याजकरितां पुरवणीं पत्रे लिहून दिल्हीं आहेत. त्याच्या नकला पाहत आहे. पेंच पडावयाचा नाही. परंतु इतला असावी याजकरितां लिहिले आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब यांची पत्रे सेनासाहेब यांस आली होती. त्यांची उत्तरे राजश्री मामांचे सल्लेने लिहून दिली. त्यांत अर्थ जेः आजपर्यंत लोभयुक्त पत्रे यावी ह्मणोन प्रतिज्ञा होती. याजकरितां उपासीतपासी मामासमागमें चार मास क्रमिले. निरुपाय जाणोन चारी घरें मोकलीं. ये गोष्टीस अनुसरलों. त्यास हालींहि पत्रें आलीं. त्यास गुह्य लिहिलें, आह्मीं मराठे, उर्मी-काय जाणो, त्यास प्रगट ल्याहावें, ह्मणजे समजण्यांत येईल, ऐसें लिहून दिल्हें आहे. सेनासाहेबसुभा यांचे विचारें कीं, मातुश्री बाईसाहेबांस घेऊन श्रीमंत राजश्री बापू व श्रीमंत राजश्री नानांनी फौजेस यावें, ह्मणजे उत्तम, कोणे गोष्टीचा पेंच पडणार नाहीं, सर्व सरदार आज्ञेंत राहतील, कामकाज जीव वादऊन करतील, व कोणहिविसीं पुढें पेंच पडणार नाहीं. बाईसाहेबांचें येणें नघडे, तरी तेथें एकाजणानें राहिलें पाहिजे, त्यास राजश्री बापूंनी तेथे रहावे आणि राजश्री नानांनी फौजेत यावे, ह्मणजे बंदोबस्त नीट होऊन कामकाज उत्तम प्रकारे होईल, पुढे पेंच पडणार नाहीं, दिवस हेच आहेत; आणि पाहता सल्लाहि हेच आहे, उभयतांतून एकजण आले, एकजण तेथे राहिले, तरी आपण अगर आपले नाना यांतून एकजणाने तेथे रहावे, एकाजणाने समागमे यावें. ऐसे यांचे मानस आहे. आणि ऐसेच घडलेही पाहिजे. श्रीमंत राजश्री नानाचे पत्र देखील आह्मांस नाहीं. विस्मरण पडलें कीं नाहीं? राजश्री मामांनीं बोलणें अगर खर्चास यास देणें तें आमचे विद्यमानें द्यावें, ऐसें तेथून यास परस्परें पत्रें आल्यास उपयोगीं आहे, परस्परें काम जाहल्यास आह्मी श्रम केले, त्याचें फल काय? तरी पुर्तेपणीं समजोन लिहावलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे आशिर्वाद.
राजश्री रावजी स्वामीस तात्यांचे सां नमस्कार, लि।। परिसोन लोभ किजे हे विनंति.