पत्रांक ९१.
श्री.
पौ छ २६ जिल्हेज,
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्रीं हरीपंत तात्या स्वामीचे सेवेसीं:-
सेवक भवानी शिवराम सां नमस्कार. विनंति उपरी येथील कुशल ता। छ १९ माहे जिल्हेज गुरुवार मुकाम मोजे इदरगांव, पा गुंजोटी, जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावें. विशेष. दोन तीन पत्रें आपणाकडून आलीं पाहीन आल्हाद जाहला. उत्तरें पाठविलीं ते पोंहचून सविस्तर कळलेंच असेल. प्रस्तुत वर्तमान कीः संकेताप्रमाणें लांब लांब सोळा सतरा कोसांच्या मजली करीत, मजल दरमजल छ १७ रोजीं गुंजोटीवर मुा केला. इतकियांत मंदारुलमहाम यांची पत्रें एकामागें एक कीं, तुह्मीं सत्वर येणें. त्याजवरून राजश्री मामा यांच्या तर्फेनें राजश्री बापू शिवदेव यांजकडील चिमणाजीपंत आह्मी दोन प्रहर रात्रीस लष्कर दाखल जाहलों. दुसरे रोजी मदारुलमहाम यांचे पुत्र डावरजंग डेरीयास आले. भेटी जाहल्या. तदोत्तर आपणहि गेलों. भेटी होऊन कित्तेक मजकूर बोलण्यांत आलें. त्याजकडील लक्ष आपणाकडे आहे. श्रीमंत दादासाहेब यांजकडून राजारामपंत नामें एक गृहस्थ व भिकणखान ऐसे आले आहेत. मजकूर कीं, आपणास साह्य व्हावें, एक दोन किल्ले व दाहा कोसांची जाहागीर देतों. त्यास अमान्य करून, लक्ष आपणाकडे ठेविलें आहे. याउपरी होईल वर्तमान तें लिहित असों. छ १८ रोजीं सेनासाहेबसुभा व राजश्री मामा यांचे भेटी जाहल्या. आज छ मजकुरीं बंदगानअल्लीच्या मुजामतीस आह्मांस मदारउलमहाम नेणार. राजश्री मामाच्याहि भेटी होतील. तदोत्तर घडेल तें वर्तमान लिहिलें जाईल. सारांश, याजंकडील लक्ष एकनिष्ठपणें आपणांकडे आहे. दुसरियाकडे कि मपिहि नाहीं. कळावें ह्मणोन लिहिलें आहे. बहुत काय लिहिणे? कृपालोभ करावा हे विनंती.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)