पत्रांक ९०
श्री.
पो छ २६ जिल्हेज.
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्री हरीपंत गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत. विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. छ १६ जिल्हेजचीं पत्रें पाठविलीं आहेत त्याजवरून कळलें असेल. राजश्री भवानी शिवराम व राजश्री त्रिंबकरावमामाकडून राजश्री शिवराम विठल यांजकडील चिमणाजीपंत मोगलांकडे पाठविले होते. छ १७ जिल्हेजीं आमचा व तांब्राच्या सैन्याचा चौं कोसांचा तफावत राहिला. मौजे कवठे पा कलबुर्गें येथें आले. राजश्री रघुनाथरावदादा यांजकडून भिकणखान मेवाती व राजाराम गोविंद कोणी मोंगलांकडे आले होते. त्यास, छ १८ जिल्हेजी फाग वद्य पंचमी सौम्यवारीं प्रहर रात्रीस रुकनद्दौला व शर्फुद्दौला व बीरबाहादर दोन कोस अलिकडे आले. आह्मी व मामा दोन कोस पुढें गेलो. भेटी जाहल्या. नवाब निजामुद्दोला यांच्या भेटी होऊन चाल ठहरावी हा प्रकार मात्र आहे. याउपरी व्हावी ते त्वराच व्हावी. लांबण होऊं नये. सर्व तुमच्या ध्यानात आहे. राजश्री कृष्णराव नारायण यांच्या पत्रावरून कळेल. अतःपर कर्तव्य कामास दिवस लागों नयेत. रा १९... माहे जिव्हेज, बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति, मोर्तबसूद.
