पत्रांक ६२.
पो ज्येष्ठ वा १३ शनवार
श्रीशंकर
१६९१ वैशाख.
चिरंजीव राजश्री बाबूराव यांसी प्रति विठ्ठल नरसिंह आशीर्वाद . उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. इकडील वर्तमान तरी मातुश्री अहिल्याबाई साल मजकूरीची रसद मागत आहे. व राजश्री तुकोजी होळकर यांणीं वराता व सरंजाम ह्मणून पंधरा सोळा हजार रुपये घेतले, नजीक वीस कोसांवरी खेचिवाडियांत आहेत. याप्रमाणें वर्तमान मामलेतीचें आहे! जकात तों अगदीं पडली. कारण ज्या मार्गानें वाणी येणार त्या मार्गावरी आजि तीन महिने फौज होळकर याची आहे. दोन वण जारेहि लुटून घेतले! त्यामुळें मार्ग राहिला. गल्ला स्वस्त ! पावणेदोन मण हरभरे व गहून * सवामण प्रमाणें कोण घेत नाहींत! खिचि वाडियांत दोन महिने फौज आहे. त्यामुळें तमाम जागा मारून लुटून फस्त केली. सलूख जाहला नाहीं, रा नारो गणेश फौजेंत आहेत. रा तुकोजी होळकर उदेपुरीं आहेत. शिंदेही उदेपुरीं आहेत. याप्रमाणे येथील वर्तमान आहे. ( यापुढे फाटलें आहे. )...........चिरंजीव राजश्री दिनकरपंत यांसी आशिर्वाद. देशींचे वर्तमान लिहित जाणें. हे आशिर्वाद.
रा विसाजीपंत यांसी नमस्कार. विनंति उपरी सदैव कुशल वर्तमान लिहित जाणें, इकडील वर्तमान उत्तम आहे. बहुत काय लिहिणें हे विनंति.