पत्रांक २४
श्री.
१६८६ माघ वद्य १३ सह १४
वेदमूर्ती शास्त्रसंपन्न राजश्री दीक्षितबावा स्वामी महाराजांचे सेवेसी-
चरणरज खंडोजी अरगडे, मुा लष्कर तुंगभद्रा, नजीक हरहरेश्वर, साष्टांग दंडवत विनंति उपरी येथील कुशल ता माघ वा १४ चतुर्दशी सोमवार पावेतों तुमचे आशिर्वादें करून सुखरूप असो. यानंतर तुह्मांपासून स्वार जालों. त्यास, तुह्मीं माणूस बराबर दिल्हें होतें तें फलटणपर्यंत आलें. तेथून न पुसतां माघारा गेला. तुह्मीं बाबूजीनाईकास व कृष्णराव बल्लाळ यांस पत्रे दिल्हीं होतीं. त्यास, बाबूजी नाईक बारामतीस गेले. त्याजपाशीं बारामतीस मीहि पत्रें घेऊन गेलों. त्यांस पत्र प्रविष्ट केलें. त्यांनीं उत्तर दिल्हें कीं, तुह्मीं पुढे चला, मीहि मागाऊन येतों. त्याजवरून, लष्करांत आलों. कृष्णा रावजीसही पत्र प्रविष्ट केलें व श्रीमंत साहेबांसही पत्र प्रविष्ट केलें. श्रीमंतांनीं चटणिसांस ताकीद केली कीं, दीक्षितांच्या नांवाच्या सनदा करून देणें. त्याजवरून सनदा करून आणिल्या. तारीख, विनंति, करावी इतकाचे गुंता होता. तों मोरोबा फडणवीस बोलिले कीं,
महाराज ! दिक्षितांत दोहीं चुलत्या पुतण्यांचें पटत नाहीं. त्यास, देणें तर विचारून द्यावें. बाबादीक्षितांचें तालुकियांत गांव यावा, ऐसाहि अर्थ नाहीं. यांजवरून, तारखा व विनंति पत्रावर जाहली नाहीं ! आबाजी माहादेव यांनीहि साहित्य केले. परंतु सखारामबापू व कृष्णराव बल्लाळ व फडणवीस वगैरे, लक्ष्मण अनंत यांच्या पल्यांत आहेत. त्यांचा पक्ष बहुत करितात. याजमुळें कामास अडथळा पडला आहे. इतकियावर स्वामीचे आशिर्वादेकरून प्रयत्नास चुकत नाहीं. पुढें जे वर्तमान होईल तें लिहून पाठवूं. कळावें. इकडील वर्तमान तरः श्रीमंत दादासाहेब आलियावर, हरपनाळीची व चित्रदुर्गची खंडणी घेऊन, हरिहर किल्ला घेतला. येथून हैदरनाईकाकडे चालिलें. पुढें हरवळीस निळकंठराव आठ दहा इजार फौज घेऊन व तोफखाना घेऊन पाठविले. हेहि मागाऊन जातात. हैदरनाईकाचे वकील आले आहेत कीं, खंडणी तीस लाख रुा घ्यावे आणि सल्ला करावा. त्यास, हे ऐकत नाहींत. जुंज करून आपला मुलूख घ्यावा आणि त्यानें आपल्या देशास जावें. याप्रमाणें वर्तमान आहे. बहुत काय लिहिणें? लोभ किजे, हे विज्ञापना. खर्चाची बहुत आबळ आहे. माहागाई बहुत आहे. सो माहादाजीनाचा द्वारें यांचा साष्टांग नमस्कार, विनंती की, लि। परिसोन माया असो द्यावी, व घरीं मुलांलेकरांचा समाचार घेत जावा. तुमच्या छायेखालीं आहेत. हे विनंती.
हें पत्र पहिलें लिहिलें होतें, परंतु कोण्ही माणूस वळखीचें तिकडें न आलें, ह्मणून आतां पाठविलें असे.