प्रस्तावना
१. राष्ट्राच्या सर्व त-हेच्या गतचरित्राचें कालानुक्रमिक व संगतवार स्मरण म्हणजे इतिहास. तो दोन प्रकारचा. तोंडी व लेखी. पैकीं दुस-या प्रकारच्या इतिहासाच्या तयारीकरितां साधनांचा हा दहावा खंड आहे.
२. ज्या लोकांची स्वचरित्राची स्मृति हारपली, ते लोक मृतवत् असून पहावें तेव्हां सदाच मूढावस्थेंत असल्यासारखे दिसतात. उदाहरणार्थ, हिंदुस्थानांतील भिल्ल, खोंड, कातकरी वगैरे लोक घ्या. हिंदुस्थानांत ह्या लोकांची वस्ती आपणां आर्यांच्याहि पूर्वीची आहे. तेव्हां ते ज्या मूढावस्थेंत होते त्याच अवस्थेंत सध्यांही बहुतेक आहेत. कारण, आपल्या गतचरित्राची स्मृति त्यांना नाहीं. स्मृति जाज्वल्य त-हेनें जागृत असली, म्हणजे गतचरित्राचा आढावा घेतां येतों, आढावा घेतां आला, म्हणजे आपले राष्ट्रीय गुणदोष कळूं लागतात; आणि गुणदोष कळले, म्हणजे दोषांचा बीमोड करून गुणांचा परिपोष करण्याकडे सहज प्रवृत्ति होते.
३. राष्ट्राचा इतिहास म्हणजे राष्ट्रांतील सर्व लोकांच्या संकलित चरित्राची हकीकत. ती लोकांपुढे मांडिली असतां, सर्व लोकांना समानस्मृतित्वामुळें ऐक्याची व बंधुप्रेमाची भावना होते. ती उत्कटत्वानें व्हावी, एतदर्थ, प्रस्तुत खंड प्रसिद्ध करण्याचें ग्रंथकारांच्या संमेलनानें ठरविलें.
४. ह्या खंडातील अर्धी अधिक पत्रे इंदूरचे श्री. माधवराव किबे व रा. आठल्ये ह्या दोन सद्गृहस्थांनीं पांच सहा वर्षांपूर्वी प्रसिद्ध करण्याचें मनात आणिलें होतें. परंतु व्यवसायबाहुल्यामुळें पत्रांच्या नकला करण्यापलीकडे त्यांच्या हातून प्रसिद्धीचें काम रेटेना. सबब, मूळ पत्रें व नकला घेऊन व त्यांत आणीक ब-याच पत्रांची भर घालून, प्रस्तुत खंड बनवला आहे. पैकीं पांच पन्नास पत्रें रा. आठल्ये यांनीं स्वतः मिळविलेलीं आहेत.
५. येथें पानिपतच्या प्रसंगापासून दुस-या बाजीरावाच्या अखेरीच्या पर्यंतच्या काळांतील पत्रे घेतलीं आहेत. पांच दहा पत्रें तद्नंतरचीं आहेत. त्यांचा उद्देश, सरदार घराण्यांचा -हास उत्तरोत्तर होऊन तो कोणत्या थरास पोहोचला, तें स्पष्ट करण्याचा आहे. अर्धी अधिक पत्रे वाई येथील रा. रा. नानासाहेब वैद्य यांच्या दप्तरांतील असून, बाकीची इतरत्र किरकोळ मिळविलेलीं आहेत.