Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२१६] ।। श्री ।। १० जुलै १७६०.
राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:
विनंति उपरि- तुमचे पदरी मामला केवढा ! तुह्यांपासून रुपया येणें किती! आणि कांहींच येत नाही. येथें खर्चाची निकड. हें कांहीच मनांत नाहीं. अपूर्व आहे ! मागें कांहीं नव्हतें त्या दिवसांत कशी चाकरी केलीत! कसें बरें ह्मणोन घेऊन या पद्धतीस आलां ! आतां तरी खावंदाचे इतबारी, मातवर मामलत पदरीं, पत चांगली, जर दंगा फार जाला तर एके सालचा ऐवज सरकारांत कर्जदाखल मेळवून द्यावा परंतु सरकारचें काम अडूं न द्यावें ! हे योग्यता असतां तपशील लिहितां हें याउपरि न करणें. पहिले लिहिल्याप्रें॥ बाकीचे ऐवजीं रुपये व रसदेचा ऐवज झाडून तरतूद हाली सालचा करणें आणि पावता करणें. याशिवाय सावकारी काहीं कर्ज मिळेल तरी मेळवणें. हिंदुपत तुमचे मामलतेंतील त्यांणी पत्र पावतांच सत्वर फौजसुद्धां यावें. तें न करितां गुमानसिंग खुमानसिंग यास बगलेंत घेऊन सरकारचे मामलतींत उफराठी खराबी मांडली असे. हे गोष्ट काहीं त्यास बरी नाहीं. तुह्मी कशी करूं देतां ? त्याचा वकील आला, निष्ठेनें बोलला, त्यावरून भरंवसा आला. दुसरें, याजवर उपकार किती ! असें असतां, अबदालीची मसलत पडली असतां, घरचे कजिये काढून ह्या गोष्टी कराव्या येणेंकरून यास याचे वडील बरें स्वर्गी कसें ह्यणातील ? व याचेंहि बरें काय होईल? काम तो श्रीकृपेनें खातरखा घडेल. याजवर मात्र शब्द लागेल. पुढें फार वाईट. त्यास हें समजावून ताबडतोब त्यास फौजसुद्धां आणून पोहोंचावणें. अबदाली राहिला तेव्हां त्याचें पारपत्य करणें. दो महिन्यांचा अवकाश आहे तों त्याणी यावें. तिकडील कजियांत एकंदर येऊं नये. आलिया बरें नाहीं. तुह्मीं फौजसुद्धां अंतर्वेदींत उतरणें. गोपाळराव गणेश यांस मेळवून घेणें. तुह्मी, ते व कांहीं गणेश संभाजी याचेहि राऊत येतील. तिकडून सारा बंदोबस्त करीत शिकोराबाद येथें येणें. तेथें सरकारचें ठाणेंहि बसलें आहे. तुह्मी कोळजळेश्वरपर्यंत आपला अंमल बसवणें. जाटाचेहि लोक पलीकडे गेले आहेत. आणखी जातील. आह्मी जलदीनेंच पार फौज आगरियाजवळ पूल बांधोन उतरतों. एका दो दिवशीं आगरियास जाऊं. पाऊसामुळें इतके मुक्काम जाहाले, नाहीं तर पोहोचलों असतों. सुज्याअतदौला यांणीं पुर्ती लबाडी केली. याउपरि त्याचे तालुकियांत फौज उतरावी. जमीदार सर्व आपले लगामी लागावयाचे असले त्याजला उत्तेजन देऊन दंगा करवावा. तमाम अंमल २९५उठवावा. तसेंच बलबडसिंग याजपासूनहि दंगा करवावा. याची तरतूद अव्वल केली पाहिजे. हें जरूर करणें. सर्व प्रकार, कसे कोण हातीं आहेत, ते कसें करणार, सरकारची फौज उतरलिया नावांचें अनुकूल कसें पडतें तेंहि सर्व लिहिणें. प्रयागपर्यंत अंतर्वेदींत त्याचा अंमल आहे तो उठवावा. प्रयागचें राजकारण जाहालें तर करावें. परंतु अंतर्वेदींत जो अंमल असेल तो उठवावा. हें करावें. पारचीहि तरतूद करणें. उत्तर सविस्तर पाठवणें. जाटाचे परगणियांत त्याचीं ठाणीं बसवणें. आपले परगणियांत आपलीं बसवणें. बुंधेले पाठवणें. गंगापारचीं राजकारणें नीट करणें. फौज तुह्मांजवळ पाठवून तुमची रवानगी करावी लागेल. मामला गेला तरी एक साल तुह्मीं कर्ज पतीवर मेळवून द्यावें. तसा तो मजकूर नाहीं. बाकीचे ऐवजीं व रसद मिळोन पंचवीस लाख सत्वर तरतूद करून पाठवणें. त्या लिहिणें या दिवसांत फारच वाईट वाटतें. तुह्मांपासून मोठीं कामें घेणें. तुह्मीं तरतूदच करावी. र।। छ २६ जिलकाद. बहुत काय लिहिणें. हे विनंति.