Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
[२१२] पे॥ प्रथम श्रावण वद्य १३, ।। श्री ।। ४ जुलै १७६०.
मु॥ सेगरनदी ( १० जुलै १७६० ).
राजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी विनंति उपरि. पत्र आषाढ शुद्ध त्रयोदशीचें पाठविले. त्यात मजकूर सुज्याअतदौला जातात; ऐकत नाहीं. पार फौज उतरावी. इटावियाकडून आपण येतों. आगरियाजवळ स्वामी आले, फौज उतरली ह्मणजे हें निमित्य करून फिरतील ह्मणोन व अबदालीचे लष्करची बातमी. तीर्थरूपाकडे जिन्नस रवाना केला तो सर्व कळला. ऐशियास, सुज्याअतदौला जातात. पुढें तेथें जाऊन तिकडून कांहीं पेंच पडला तर-तर कसें करितील ? हें कळत नाही. अथवा जरब मातबर आमचे तर्फेनें सारियावरी बसेल तेव्हांच नरम येतील. पुढें वर्तमान लिहीत जाणें. शाहाजादे दोहींकडे येत नाहींत असें आहे तें बरेंच आहे. तुर्त असेंच असावें. तिकडे न जावें हेंच उत्तम आहे. फर्माशी जिन्नस पाठविला, उत्तम केलें. पैका पाठवावयास फार दिवस लागले. लौकर पाठवणें. पार२९३ उतरून आपले ठाणियाचा बंदोबस्त करणें. पाऊसामुळें गंभीर नदीस पाणी, यास्तव मुकाम जाहाले. एका दो दिवशीं आगरियास जाऊं. पूल बांधोन पार फौज उतरूं. तुह्यांकडेहि फौज कांहीं येईल. वरचेवरी गिलज्याचे लष्करचें वर्तमान लिहिणे. सुज्याअतदौला गेले. तेव्हां त्याचे तालुकियांत जमीदारांनीं फिसाद करावी, त्यांस पायबंद बसावा, याचा विचार काय तो माहितगारीनें सर्व लिहिणें. तुमचे लगामी कोणकोण आहेत, तजवीज सर्व लिहिणे. जशी आज्ञा होईल तसें करणें. तुह्मी, गोपाळराव गणेश, गणेश संभाजी, गोपाळराव बापुजी ऐसे सारियानें फौजसुद्धां अतर्वेदींत उतरावें. कोळेचे सुमारें सारियानें जमा व्हावें. आपले आपले ठाणियाचा बंदोबस्त करावा. सरकारचे फौजेची उतरावयाची तरतुद करणें ती करूं. जाणिजे. छ २० जिलकाद. +हे विनंति.