Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

रयतेला दिलदिलासा देण्याचें काम त्यानें सोडून दिलें; कुळांनीं लावणीसंचणी करावी ह्याकरितां मख्त्याच्या वेळीं तो त्यांना तगाई देत असें ती त्यानें बंद केली व येरंडे व कानिटकर ह्यांना न भेटता तो अंतर्वेदींत निघून गेला. हातानें सरकारचें असें नुकसान करून तोंडानें मात्र सरकारचा नफा होईल तितका करून देईन असें येरंड्यांना लिहिण्यास त्यांनें कमीं केलें नाहीं. “ज्याप्रमाणें श्रीमंत स्वामीची मर्जी त्याप्रमाणें मजला करणें आणि तुमची खुषी तेंच मजला करणें,” असा त्यानें येरंड्यांना व पेशव्यांना लिहिण्याचा पाठ ठेविला (लेखांक १४२). परंतु ह्या त्याच्या गोड भाषणांना पेशवे भुलले नाहींत. योग्य वेळ आली म्हणजे गोविंदपंताची मामलत काढून टाकावयाची असा त्यांनीं अंतस्थ बेत केला. ह्या अंतस्थ बेताची कुणकुण गोविंदपंताच्या कानांवर गेली होती (लेखांक २४२). परंतु प्रसिद्धपणें त्याचा पुकार त्यांनी कधींच केला नव्हता. येणेप्रमाणें दोघांचीहि मनें परस्पराविषयीं संशयग्रस्त झालीं होतीं. प्रसिद्धपणें एकमेकांचें नुकसान करण्याची दोघांचीहि इच्छा नव्हती; परंतु, अंतस्थ रीतीनें एकमेकांचें नुकसान करण्याचे प्रयत्न दोघांचेहि चालूं होते. गोविंदपंत उत्पन्नाच्या बाबतींत नुकसान करून दाखवील हें पेशवे जाणून होतें. ह्याच्याहि पलीकडे जाऊन राजकारणांत तो काहीं घोंटाळा करील हें मात्र काहीं काळपर्यंत त्यांच्या स्वप्नींहि नव्हतें. परंतु पेशव्यांचे हें अज्ञान फारच हानिकारक होतें. कारण, सरकारचें उत्पन्न गोविंदपंताने कमी तर केलेच, परंतु एवढेच करून तो थांबला नाहीं. तर पेशव्यांच्या मर्जीतला जो दत्ताजी शिंदे त्याचेंहि १७५९ व १७६० तील रोहिल्यांच्या व अबदालीच्या लढाईत नुकसान केलें; अशा भीतीनें कीं, पेशव्यांप्रमाणें दताजीहि आपली कमावीस आपल्याकडून काढून टाकील. गोविंदपंताने केलेल्या दत्ताजीच्या नुकसानाचा व हानीचा पत्ता पेशव्यांना बिलकूल नव्हता. कारण, रोहिल्यांशीं व अबदालीशीं दत्ताजीचे युद्ध चाललें असतांना, लढाईची दत्ताजीसंबंधीं वगैरे बातमी पेशव्यांना गोविंदपंतच देत असे. तींत रोहिल्यांना आपण दिलेली फूस, ऐन अबदालींशी लढाई होण्याच्या प्रसंगी आपण सांगितलेला निरोप, प्रत्यक्ष लढाईपासून दूरदूर राहण्याची आपली इच्छा, वगैरे स्वकृत दुष्कर्माचे वर्णन गोविंदपंताने केलें नाहीं, हें उघडच आहे. ह्या वेळीं पेशव्यांना पाठविलेल्या पत्रांत, अबदालीचे वर्चस्व, मराठी सैन्याची दुर्दशा, शिंद्यांची हानि वगैरे प्रसंगांची माहिती देऊन मदतीला ताबडतोब सैन्य पाठवून द्यावें, अशी गोविंदपंतानें सविनय प्रार्थना केलीं.