[५९]                                                                      ॥ श्रीशंकर ॥                                                 १२ मार्च १७५७

 

सेवेसी विज्ञापना. स्वामींनीं लिहिलें कीं, "गोपाळ केशव वगैरे लक्ष्मण१२७ शंकराचे कारभारी यांजपासून साधेल रुपया वगैरे ऐवज तो घ्यावा. कारभारी याणींच चोरी करून रुपये खादले. मागें कागदावर सरकारच्या मोहर संदुखावर करून ठेवल्या असतां ते यांणीं फाडून कागद नेले. तस्मात् पुर्ते लबाड ठहरले. यास्तव यांची जप्ती करून साधेल तें साधावें व घोडीं वगैरे जप्त करावीं. घोडियांपैकीं दोनशें घोडीं तेथें ठेवणें व बाकी हुजूर पाठविणें." ह्मणोन आज्ञा. ऐशियांसी, आह्मीं नर्मदेचे तळावरून* जप्तीस पाठविले. गोपाळ केशवास हुजूर आणिलें. लबाडहि असतीलसें वाटतें. यास काढिलें तेव्हां थोडीशी लबाडी केलीच. अद्यापिहि रयतीमध्यें फितूर आहे. परंतु आह्मीं येथें आणून थोडेंसें तडकाविलें. आतां मामला जप्त करून मामलत चालीस लाविली व यांचेहि घर जप्त करावयास ताकीद केली. या ब॥ याजपाशीं काय हातीं लागेल? घोडीं वगैरे फारकरून लक्ष्मण शंकराचा लवाजिमा नारो शंकर याजपाशीं आहे. ते हुजूर आलियावरी त्यांचीहि जप्ती करितों. प्रतापसहा व विसाजीपंत स्वामींकडून आले त्यांसहि ओडसयास रवाना केलें आहे. स्वामींस कळावें. र॥ छ २१ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. हे विज्ञापना.

पे॥ छ १३ साबान.