[४७] ।। श्री ।। ९ फेब्रुवारी १७५५
राजमान्य राजश्री बाबूराव महादेव दि॥गोपाळराव गणेश गोसावी यांसः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सुहुरसन खमसखमसैन मया व अलफ. तुह्मी पत्र पाठविलें प्रविष्ट जाहालें. लिहिलें वृत्त अवगत जाहालें. याज उपरि जालें वर्तमान वरचेवरी लिहीत जाणें. असेंच सर्वदा कच्चें वर्तमान लिहीत जाणें. यानंतर येथून गिरमाजी व्यंकटेश व माधवराव पाठविले आहेत. हे पोहोचल्यावरी तेथें रंग कसा पडतो, काय मजकूर होतो, तो सविस्तर लिहिणें. जर तेथें जीव असला तरी काशीचा कमाविस गोपाळराव गणेश याचे तर्फेनें करणें. नाहीं तरी गिरमाजी व्यंकटेशाबरोबर तुह्मी येणें. खर्च सात हजार पडला वगैरे तपशील ओढगस्तीचा विस्तार लिहिला तरी ओढ तूर्त तशीच सोसणें. काम जाहल्यावरी सारेंच सोईस पडेल. जर काम न जाहालें तरी तुह्मी हुजूर येणें. मग वाजवी खर्च असेल तो दिल्हा जाईल. व तुह्मी गिरमाजी व्यंकटेश, माधवराव यास ताकीद करोन कामें सरकारचीं होत तें करणें. मागाहून गोपाळरावहि येणार. आठपंधरा दिवस हुजूर पोहोंचतील. जाणिजे. छ २७ रा।खर.
लेखन सीमा